आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाय वे, माय वे!:काँट्रॅक्टर, बिल्डर, उद्योजक व राजकारण्यांच्या जमिनींसाठी बदलली राष्ट्रीय महामार्गाची दिशा, गावात थेट रस्ता असतानाही एनएचएआयने मंजूर केला ‘बायपास’

औरंगाबाद | नामदेव खेडकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन महामार्ग होण्याची कुणकुण लागताच धनदांडगे लोक त्या मार्गावर जमिनी घेऊन ठेवतात. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात काँट्रॅक्टर, बिल्डर, उद्योजक व राजकारण्यांनी आधीच घेऊन ठेवलेल्या जमिनींमधून महामार्ग टाकण्याचा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे. या मार्गावर सर्वात छोटे गाव गेवराई तांड्यातून थेट रस्ता असतानाही बायपास मंजूर केला. तो राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व कन्सल्टंटने तांड्याच्या पूर्वेला असलेल्या धनदांडग्यांच्या जमिनींमधून घातला. म्हणजेच आता या धनाढ्यांच्या जमिनींचे दुप्पट-चौपट दराने भूसंपादन होईल, उर्वरित जमिनींचे मूल्यही वाढेल.

औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे. यासाठी भूसंपादन प्राधिकाऱ्यांनी थ्री-ए नोटिफिकेशनद्वारे संपादित होणाऱ्या जमिनींच्या गटांची यादी प्रकाशित केली. रस्त्याच्या डीपीआरचे कंत्राट असलेल्या ‘एजीस इंडिया इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स’ कंपनीने औरंगाबाद-पैठण रस्त्यावर २ ठिकाणी उड्डाणपूल व दोन गावांना बायपास सुचवला आहे. त्याआधारे भूसंपादन प्राधिकाऱ्यांनी संपादित होणाऱ्या गटांची यादी प्रकाशित केली.

नवीन बायपास कोणत्या गटातून जाणार आहे याची माहिती देणारे थ्री-ए नोटिफिकेशन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने २४ मार्च २०२२ रोजी प्रकाशित केले.

नोटिफिकेशनच्या केवळ १५ दिवसांआधी, म्हणजे ८ मार्चला ... ग्रामस्थांनी दै. दिव्य मराठीला उपलब्ध करून दिलेल्या खरेदीखतानुसार, एका कंत्राटदाराच्या कुटुंबीयांनी जेथून बायपास जाणार आहे तेथे २ कोटी २३ लाख ८५ हजार रुपयांत ६ एकर दोन गुंठे शेतजमीन खरेदी केली. त्याचे धनादेशही एकाच दिवसात देण्यात आले. बायपाससाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली तर कंत्राटदारांना दुप्पट ते चौपट मावेजा मिळू शकतो.

जमीन मालकांची कमाल : बायपासच्या नोटिफिकेशनच्या १५ दिवस आधी जमीन खरेदी, ऐन उन्हात फळझाडांची लागवड

उष्णतेची तीव्र लाट असताना २, ३ एप्रिलला या जमिनींवर आंब्याची मोठी झाडे लावण्याचे काम सुरू होते. मावेजा देताना फळझाडांचे मूल्यांकन अधिकचे येते, म्हणून फळझाडे लावली जातात.

... हा प्रकार समोर आल्यानंतर ग्रामस्थ म्हणाले - मावेजा देऊन आमची घरे पाडा, जागा ताब्यात घ्या, पण रस्ता गावातूनच करा.

ग्रामस्थांची परवानगी असेल तर गावातूनच रस्ता करू
गेवराई तांड्यात रुंदीकरणात रस्त्यालगतची घरे पाडावी लागली असती. ग्रामस्थ त्याला विरोध करतील, म्हणून रस्ता रिअलाइनमेंट केला आहे. ग्रामस्थांची मावेजा घेऊन घरे पाडण्यास आणि ती जागा रस्ता रुंदीकरणासाठी देण्याची तयारी असेल तर अजूनही गावातून रस्ता केला जाऊ शकतो. थ्री-ए नोटिफिकेशन बदलणे अजूनही शक्य आहे. - महेश पाटील, व्यवस्थापक, एनएचएआय

सर्वात छोटे गाव, तरीही बायपास
औरंगाबाद-पैठण रस्त्यावर गेवराई तांडा हे सर्वात छोटे गाव आहे. तरीही या गावाला पूर्वेकडून बायपास रस्ता (रि-अलाइनमेंट) करण्यात येणार आहे. म्हणजे हे गाव आता हायवेवर नसेल. गेवराई तांड्यापेक्षा मोठ्या गावांना मात्र बायपास केलेले नाही. विशेष म्हणजे या गावात अतिक्रमणे नाहीत, ना वाहतूक कोंडी. तरीही गावाला बायपास देण्यात आला आहे.

बक्कळ मावेजा, जमिनींची मूल्यवाढ
गेवराई तांड्याच्या पूर्वेला काँट्रॅक्टर, बिल्डर, उद्योजक व नेत्यांच्या जमिनी आहेत. सध्याच्या दुपदरी रस्त्यालगत स्थानिकांच्या जमिनी-प्लॉट्स आहेत. गावातून हा रस्ता टाकला असता तर स्थानिकांना भूसंपादनातून मावेजा मिळाला असता, राहिलेल्या जमिनींचा भाव वाढला असता. शिल्लक राहिलेल्या जागेचा व्यावसायिक वापर करता आला असता. मात्र, डीपीआर बनवताना गावातून रस्ता न टाकता गावाच्या पूर्वेला धनदांडग्यांच्या जमिनींमधून तो टाकला.

1. सध्या औरंगाबाद-पैठण हा रस्ता १०० फूट रुंद संपादित जागेत दुपदरी आहे. तो आता चारपदरी करण्यासाठी अधिकची ५० फूट जागा संपादित करायची आहे. मात्र, या बायपाससाठी पूर्ण १५० फूट रुंद जागा संपादित करावी लागणार आहे. नवीन बायपासमुळे रस्त्याची लांबी वाढणार, पर्यायाने रस्त्याच्या बांधकामालाही खर्च अधिक येणार

2. गेवराई तांड्यामधून जाणारा सध्याचा रस्ता सरळ आहे. इथे नवीन बायपास केल्यास रस्त्याची लांबी वाढेल. तसेच बायपाससाठी १० हेक्टर जमीन संपादित करावी लागेल.

3. बायपास न करता गेवराई तांड्यातूनच रस्ता पुढे नेल्यास अवघे ३ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागेल. म्हणजे बायपासमुळे रस्त्याची लांबीही व पर्यायाने खर्चही वाढणार आहे.