आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बळीराजावर संकट:महाराष्ट्रातील नऊ जिल्हे ओल्या दुष्काळाच्या छायेत; बळीराजाला यंदा दुहेरी फटका, अतिरिक्त उत्पन्नही हातून गेले

संतोष देशमुख / दिलीप पाईकराव | औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वातंत्र्योत्तर काळातील 14 दुष्काळ, मराठवाडा तर नेहमीच दुष्काळी
  • औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, धुळे, जळगाव, वाशिम, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिकांचे अतोनात नुकसान

कोरड्या दुष्काळाचा सातत्याने सामना करीत असलेल्या मराठवाड्यातील बळीराजाला यंदा मात्र पावसाची भीती वाटू लागली आहे. यंदा मान्सूनचा पाऊस अतिवृष्टी स्वरूपात पडत असल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाच्या पाण्याने पिके मातीमोल होत असल्याने त्याच्या डोळ्यांतही पाणी तरळले आहे. यंदा मराठवाडा अर्थात औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांवर ओल्या दुष्काळाचे ढग दाटलेले आहेत. तर, नाशिक विभागात अहमदनगर, धुळे, जळगाव, अमरावती विभागात वाशिम, पुणे विभागात सांगली आणि कोकण विभागातील सिंधुदुर्ग या नऊ जिल्ह्यांतील शेती उत्पन्नावर पावसाचे पाणी फेरले गेले. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या जिल्ह्यांत ३३ टक्के पिकांचे नुकसान झाले आहे.

औरंगाबाद, जालना, बीड, वाशिम, सिंधुदुर्ग, धुळे, नगर, जळगाव, सांगली या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा २२ ते ७४ टक्के जास्त पाऊस झाला आहे. दररोजच कुठे ना कुठे पाऊस पडत असल्याने खरिपाचे नुकसान होत आहे. जेथे ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस म्हणजे अतिवृष्टी झालेली सर्व मंडळे सरकारी निकषानुसार ओल्या दुष्काळास पात्र आहेत. मात्र, कोरोनाच्या लढाईतच गारद झालेल्या राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचाली दिसत नाहीत.

ओला दुष्काळ पडला, असे कधी म्हणायचे?

सतत सरासरी पर्जन्यमानापेक्षा जास्त पाऊस पडणे, ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडणे म्हणजेच अतिवृष्टी होणे, पुरामुळे व शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होणे, गुणवत्ता व दर्जावर विपरीत परिणाम होणे, जीवित व वित्तहानी होणे, पाण्याची सुकाळ परिस्थिती उद््भवणे व दुष्काळाच्या विरुद्ध स्थिती म्हणजे ओला दुष्काळ होय. ३३ टक्के पिकांचे नुकसान झाले अशी खात्री पंचनाम्यांतून पुढे येणे, यास ओला दुष्काळ म्हटले जाते.

बळीराजाला यंदा दुहेरी फटका, अतिरिक्त उत्पन्नही हातून गेले

यंदा वेळेवर पाऊस झाल्याने पेरणी वेळेवर झाली. पिके चांगली बहरली असताना यंदा सरासरी उत्पादनापेक्षा ३० ते ४० टक्के उत्पादन जास्त होणार, असाच अंदाज होता. पण, निसर्गाची अवकृपा झाली. ढगांचे आच्छादन जास्त काळ राहिले. अतिवृष्टी होत आहे. सूर्य प्रकाशाअभावी प्रकाश संश्लेषण प्रक्रिया घडली नाही. दमट वातावरणाने कीड व रोगाचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी व अपोषक वातावरणाने खरीप पिकांची गुणवत्ता व दर्जा घसला. बाजरी, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडिदासह मक्याच्या कणसाला कोंब फुटले आहेत. पिकात पाणी साचून पिके हातून गेली.

बहुतांश पिकांची धूळधाण, आता उरल्यासुरल्या कपाशीवरच भिस्त

‘दिव्य मराठी’ने एकूणच महाराष्ट्रातील पीक परिस्थितीचा आढावा घेतला. मूग, उडीद हे ६५ ते ८० दिवस कालावधीचे पीक ऑगस्टमध्ये भिजून त्याला कोंब फुटले. ९० ते ११५ दिवसांत काढणीला येणारे सोयाबीन ऑगस्ट अखेर आणि सप्टेंबरमधील पावसाने भिजून मातीत मिसळले. जे काही उत्पन्न हाती आले ते काळवंडले. अडीच महिन्यांत काढणीस येणाऱ्या बाजरीला अंकुर फुटले. तीन महिने कालावधीचे मका पीकही हातून गेले. तूर आणि कपाशीच्या शेतात पाणी साचत असल्याने कपाशीची बोंडे कुजू लागली, तर तुरीचे पीक पिवळे पडू लागले.

ओल्या दुष्काळाचे निकष बदलायला हवेत

पावसासाठी हवामान बदल हे प्रमुख कारण आहे. त्यामुळेच गतवर्षी पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी तर मराठवाड्यात दुष्काळजन्य स्थिती होती. यंदा मराठवाड्यात अतिपाऊस तर विदर्भात कमी पाऊस पडला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी हवेचा दाब सक्रिय राहिला व पूर्व मार्गे तो औरंगाबाद, नगर, धुळे, गुजरात अशा पट्ट्याने पाऊस खेचून आणला. ला निनोचा परिणामही प्रभावी ठरला. ओल्या दुष्काळाचे निकष बदलणे गरजेचे आहे. अतिवृष्टीचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई दिली जावी. डॉ. रामचंद्र साबळे, कृषी व हवामान तज्ज्ञ

२०१३ मधील कोरडा दुष्काळ

महाराष्ट्रात २०१३ मध्ये पडलेल्या कोरड्या दुष्काळाची तीव्रता अधिक होती. तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी १३ मार्च २०१३ रोजी १,२०७ कोटींचा मदत निधी जाहीर केला होता. सध्या राज्यात शरद पवार यांच्या पक्षासह मित्र पक्षांचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे त्यांना ‘जाणता राजा' ही उपाधी देणाऱ्या महाराष्ट्रातील बळीराजाला या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

सरकार थंड बसले, दुष्काळही आम्हीच जाहीर करावा का?

अनेक जिल्ह्यांत विशेषत: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे उत्पन्न गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता पीक विम्यासह सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. त्यासाठी केंद्र, राज्य सरकारने तातडीने पावले उचलून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे अनिवार्य आहे. अन्यथा उद्रेक होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना उभे करणे गरजेचे आहे . त्यासाठी दुष्काळाचे निकष बदलून अतिवृष्टीच्या जिल्ह्यांत तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत गरजेची आहे. सरकार थंड बसले आहे. तेव्हा दुष्काळही माध्यमांनीच जाहीर करावा का?

स्वातंत्र्योत्तर काळातील १४ दुष्काळ, मराठवाडा तर नेहमीच दुष्काळी

भारतीय स्वातंत्र्यानंतर देशात १९५१, १९६५, १९६६, १९६८, १९७२, १९७९, १९८२, १९८५, १९८६, १९८७, २००२, २०१५, २०१६ असा १३ वेळेस दुष्काळ पडला.

मराठवाड्यात कायमच दुष्काळ पडतो. परिस्थितीनुसार राज्य सरकार दुष्काळ जाहीर करत असते. आता राज्यातील पैसेवारीवर दुष्काळ ठरणार आहे. एक तर पूर्ण राज्यात किंवा काही प्रदेशांत राज्य सरकार दुष्काळ जाहीर करू शकते. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये सरकार पैसेवारी जाहीर करते. यानंतरच दुष्काळाचा निर्णय केला जाईल. मराठवाड्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आहे.

वाशिम जिल्ह्यात पीक नुकसान, साताऱ्यात बटाट्याचे पीक नासले

वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. बुलडाणा जिल्ह्यात अपेक्षित ६४३.३ मिमी पावसाच्या तुलनेत ७४८.७ तर वाशिम जिल्ह्यात ७६९.९ पावसाच्या तुलनेत ९७४.६ अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले. तर सातारा जिल्ह्यातील पुसेगाव परिसरातील बटाटा पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. बटाटा नासण्याचे प्रमाण अधिक असल्याने उत्पादनात ६० ते ७० टक्के घट झाली आहे. प्रति क्विंटल १२ ते १५ क्विंटल एवढा उतारा अपेक्षित असताना केवळ पाच ते सहा क्विंटल एवढाच उतारा पडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...