आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक खाते हॅक:वीज बिलाच्या नावाखाली पुन्हा नऊ लाखांचा गंडा

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तुम्ही वीज बिल भरले नसून वीजपुरवठा खंडित न होण्यासाठी तत्काळ संपर्क करा,’ असे मेसेज पाठवून ग्राहकांचे बँक खाते हॅक करणारी टोळी सध्या सक्रिय आहे. एका प्राचार्याने वेळीच प्रसंगावधान राखल्याने काही दिवसांपूर्वी त्यांची फसवणूक टळली होती. मात्र याच मोडस ऑपरेंडीने सायबर भामट्यांनी एका निवृत्त प्राध्यापिका नीलिमा मुरुगकर (६५) यांच्या खात्यातून ९ लाख ८९ हजार ८७७ रुपये लंपास केले.

सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोमटे यांच्या मोबाइलवर २५ जुलै रोजी एक मेसेज आला. त्यात मागील महिन्याचे बिल थकीत असल्याने तुमचा वीजपुरवठा रात्रीपासून खंडित करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी तत्काळ आमच्या वीजपुरवठा अधिकाऱ्यांना संपर्क साधा असा मेसेज प्राप्त झाला. लोमटे यांनी तो मेसेज पत्नी नीलिमा यांना पाठवून नेमके काय झाले ते पाहण्यास सांगितले. प्रा. नीलिमा यांनी वीज खंडित होण्याच्या काळजीने तत्काळ मेसेजमधील क्रमांकावर संपर्क साधला व आम्ही तर बिल भरले आहे असे सांगितले. त्यावर भामट्यांनी ‘भरले असल्यास ते अपडेट झाले नसेल’ असे सांगून मी सांगेल ती प्रक्रिया पार पाडा, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवत नीलिमा यांनी भामट्याने दिलेल्या सूचनांचे पालन केले.

आरोपीने त्यांना एक अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यावर आधी दहा रुपये ऑनलाइन भरण्यास सांगितले. या व्यवहाराच्या आधारे नीलिमा यांच्या खात्याची माहिती त्याने अॅपद्वारे मिळवली. त्यात प्रामुख्याने बँक खात्याची माहिती व पासवर्ड टिपला. काही क्षणात त्याने नीलिमा यांच्या खात्यातून सात ट्रांझॅक्शनद्वारे ९ लाख ८९ हजार ८७७ रुपये काढून घेतले. हा प्रकार कळताच नीलिमा यांनी सायबर पोलिस ठाण्यात तत्काळ धाव घेतली. त्यानंतर प्राथमिक तपास करून पहिले क्रांती चौकात प्रकरण पाठवण्यात आले व नंतर वेदांतनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

महावितरण म्हणते आम्ही असे मेसेज पाठवत नाही
राज्यात असे प्रकार वाढल्याने महावितरणने यापूर्वीच ‘असे मेसेज आम्ही पाठवत नाही. तरी ग्राहकांनी बळी पडू नये,’ असे आवाहन प्रसार माध्यमातून केले आहे. मात्र तरीही अनेक ग्राहक विशेषत: सुशिक्षित लोक या प्रकाराला बळी पडत आहेत. सहा महिन्यात अशा फसवणुकीचे प्रकार वाढले असल्याचे निरीक्षण सायबर पोलिसांनी नोंदवले आहे.

बातम्या आणखी आहेत...