आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धांजली:‘बुरगुंडा’ देशभर गाजवला; शेतकरी मुलगा नवरा हवा असं म्हणणाऱ्या मुलीला द्यायचे एक हजार रुपये बक्षीस

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारूडरत्न निरंजन भाकरेंचे कोरोनाने निधन; देहदान- नेत्रदानाचा संकल्प मात्र काेराेनामुळे अपूर्णच

एकेकाळी गावात शिवणकाम करत उदरनिर्वाह करणारे, औरंगाबादेतही दहा रुपये रोजंदारीवर काम केलेले निरंजन भाकरे अंगभूत गुणांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर लोककलावंत झाले. पण त्यांनी जगण्यातील साधेपणा कधीच सोडला नाही. त्यांची सामाजिक बांधिलकी एकदम उच्च प्रतीची होती. ‘बये तुला बुरगुंडा हाेईल गं’ या भारूड सादरीकरणाने ते प्रसिद्ध हाेते. शेतकरी मुलगा नवरा हवा, असं म्हणणाऱ्या मुलीला ते एक हजार रुपये बक्षीस देत असत. मूळ रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथील रहिवासी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारूडकार निरंजन भाकरे यांचे २३ एप्रिल रोजी वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी कोरोनाने निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मोठे बंधू, तीन विवाहित कन्या, एक मुलगा असा परिवार आहे.

देहदान-नेत्रदान करण्याची त्यांची अंतिम इच्छा काेराेना झाल्याने मात्र पूर्ण हाेऊ शकली नाही. गेली ३०-३५ वर्षे लोककला, भारूड जगतावर भाकरेंचे गारूड होते. ‘सुया घे, पोत घे ओ माय’ अशी हाळी देत आणि अवघा रंगमंच दणाणून टाकत. जैन समाजाचे असलेल्या भाकरेंच्या घरची स्थिती खूप बिकट होती. त्यामुळे त्यांनी शिवणकाम सुरू केले. वडील गुरुदेव सेवा मंडळाचे काम करत. तुकडोजी महाराजांचे अभंग गात. त्यातून त्यांच्यावर गाण्याचा संस्कार झाला. १९७२-७३मध्ये दुष्काळामुळे ते औरंगाबादेत आले. दहा रुपये रोजाने मोलमजुरी करू लागले. त्याच काळात त्यांचा प्रख्यात संगीतकार अशोकजी परांजपेंशी परिचय झाला आणि गायकाचे रूपांतर अस्सल लोककलावंतात झाले, असे प्रा. डॉ. राजू सोनवणे, शाहीर अंबादास तावरेंनी सांगितले.

मुलगी झाली म्‍हणून पाच हजार रुपये द्यायचे : चंदनशिवे
प्रख्यात लोककलावंत, मुंबई विद्यापीठ लोककला विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, प्रख्यात लोककलावंत दिलीप खंडेराय यांनी सांगितले की, भाकरेंना अमेरिकेतील शिकागोत भारूड सादर करण्‍यासाठी अशोक हांडे यांची खूप मदत मिळाली. ते मुंबई विद्यापीठात, दिल्लीच्या एनएसडी (राष्ट्रीय नाट्य विद्यालय) भारूड शिकवायचे. ते ज्या गावात कार्यक्रमासाठी जात, तेथे चार- पाच दिवसांत कुणाला मुलगी झाली असल्‍यास ते आपल्‍या मानधनातील पाच हजार रुपये मुलीच्या बापाला द्यायचे. पाच आदर्श कुटुंबांचा सत्कार करत. संत एकनाथ महाराजांनी रचलेल्या भारुडांचे प्रभावीपणे सादरीकरणासाठी लागणारे सोंगी मुखवटे बनवण्याची कलाही त्यांच्याकडे होती.

स्वच्छता अभियान ते व्यसनमुक्तीसाठी जनजागृती
महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान जाहिरातीत त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबत ‘मला दादला नको गं बाई’ भारुडाद्वारे जनजागृती केली. विविध वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम लोकप्रिय होते. पूर्णपणे व्यसनमुक्त कुटुंबातील माता, देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढत असलेल्या जवानाची माता, एका मुलीवर प्रपंचाची धुरा सांभाळणारी माता, त्याचबरोबर शेतकरी नवरा हवा असे म्हणणाऱ्या मुलीला एक हजार रुपये भेट असा उपक्रम भाकरे राबवत असत.

७५ मीटरचा पायघोळ अंगरखा
लोककलेचे अभ्यासक, इंडियन नॅशनल थिएटरचे संचालक अशोकजी परांजपेंनी भाकरेंना परभणीचे गोंधळमहर्षी राजारामबापू कदम यांच्या साठवारी चुणीदार अंगरख्याची माहिती दिली. त्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी ७५ मीटर पायघोळ अंगरखा परिधान केला. १४ फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबई येथे इंडियन नॅशनल थिएटरच्या रंगमंचावर अडीच तास झोकदार, तालेवार दिमाखदार गिरकी घेत उत्कृष्ट भारूड सादर केले. त्याची वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड‌्समध्ये नोंद झाली.


बातम्या आणखी आहेत...