आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी आणखी तीन कॉलेजांच्या विरोधात ‘नो अॅडमिशन कॅटेगरी’ची कारवाई केली आहे. त्यामध्ये शहरातील दोन तर फुलंब्री तालुक्यातील एक कॉलेज आहे. तीन्ही कॉलेजात मान्यताप्राप्त अध्यापक, पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे निष्पन्न झाले होते. बुधवारी कुलगुरूंनी सर्व संस्थाचालकांची बाजू ऐकूण घेतली. तीन्ही कॉलेजला प्रत्येकी दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे.
विद्यापीठाशी संलग्नित 480 पैकी 70 कॉलेजमध्ये अजिबात पायाभूत सुविधा नाहीत. मान्यताप्राप्त अध्यापकही नाहीत अशा कॉलेजांवर सध्या गंभीर कारवाई केली जात आहे. 11 महाविद्यालयांची चौकशी केली आहे. त्यापैकी सहा कॉलेजांवर प्रवेश बंदीची कारवाई यापूर्वीच केली आहे. शिवाय आणखी 12 महाविद्यालयांवर टांगती तलवार आहे. बुधवारी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत व्यवस्थापन परिषद कक्षात अंतिम सुनावणी घेण्यात आली. यावेळी संस्थाचालकांच्या प्रतिनिधींची कुलगुरूंनी बाजू ऐकली. पण कुलगुरूंचे समाधान न झाल्यामुळे तीन्ही कॉलेजचा 'नो अॅडमिशन कॅटेगिरी'त समावेश केला आहे.
पाथ्रीचे राजर्षी शाहू महाराज काॅलेज
फुलंब्री तालुक्यातील पाल-पाथ्रीत ज्येष्ठ नेते द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांचे राजर्षी शाहू महाराज कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय आहे. या कॉलेजने इमारत चांगली बांधली आहे. मात्र मान्यताप्राप्त अध्यापक व शैक्षणिक सुविधा नाहीत. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. भालचंद्र वायकर यांनी चौकशी केली तर अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे कुलगुरूंनी विना अनुदानितच्या सहा तुकड्यांचे प्रवेश प्रक्रिया बंदचा निर्णय घेतला आहे.
पडेगावचे व्यवस्थापनशास्र महाविद्यालय
पुरोगामी शिक्षण सांस्कृतिक क्रीडा प्रसारक मंडळ संचलित वामनराव पितांबरे व्यवस्थापनशास्र महाविद्यालय पडेगाव येथे आहे. या कॉलेजमध्ये मान्यताप्राप्त अध्यापकांचा आभाव आहे. मात्र त्यांनी अध्यापकांना सेवेत घेण्यासाठी सक्षम निवड समिती गठित करण्यासाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव दिलेला आहे. एकाच इमारतीत अनेक अभ्यासक्रम असल्याचे दाखवले आहे. संगणक प्रयोगशाळेसह इतर पायाभूत सुविधा नसणे, कमी वेतन असलेल्या 16 जणांचे सीपीएफ म्हणजेच कॉन्ट्रीब्युटरी प्रॉव्हिडंट फंड भरलेला नसणे आदी दोषारोप त्यांच्यावर आहेत. या कॉलेजची संलग्नता रद्द का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजवाण्यात येणार आहे.
रोशन गेटचे सर सय्यद कॉलेज
रोशन गेट येथे 32 वर्षांपासून सर सय्यद काॅलेज भाडे तत्वावर आहे. कॉलेजमध्ये युजी-पीजी शिक्षण घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र येथे मान्यताप्राप्त प्राध्यापक आणि पायाभुत सुविधा नाहीत. विशेष म्हणजे, स्वच्छतागृहे, नियमानुसार प्रयोगशाळा आणि ग्रंथालय देखील नाही. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबवण्याचे कुलगुरूंनी अदेश दिले आहेत. या कॉलेजला २ लाख रूपयांचा दंड पंधरा दिवसांत भरावा लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.