आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरदारास गंडा:ना कॉल ना ओटीपी मागितला, तरी कार्डवरून 93 हजार गायब; मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉल न करता, ओटीपी क्रमांकाची देवाणघेवाण न करतादेखील क्रेडिट कार्डवरून दोन ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या अॅपद्वारे ९३ हजार ५२५ रुपये परस्पर लंपास झाले. अनुप श्रोत्रिय (५०) यांच्यासोबत हा प्रकार घडला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माछर इंडस्ट्रीत मुख्य वित्तीय अधिकारी असलेल्या श्रोत्रिय यांना ११ मे रोजी दुपारी मोबाइलवर सलग पाच वेळा बँकेचे मेसेज अाले. त्यात त्यांच्या क्रेडिट कार्डवरून फ्रीचार्ज व मोबिक्विक या दोन अॅपवर पैसे वळते झाल्याचा उल्लेख होता.

अवघ्या पाच मिनिटांमध्ये सायबर गुन्हेगारांनी पहिल्या टप्प्यात ८,२९६ रुपये, दुसऱ्या टप्प्यात ४७,८९२ रुपये, तिसऱ्या टप्प्यात ८,२९६ रुपये, चौथ्या टप्प्यात ८,२९६ तर शेवटी ८,२९६ रुपये काढून घेतले. या सर्व प्रक्रियेदरम्यान किंवा आधी मला कुठलाही कॉल आला नाही तसेच मी कुणाला ओटीपी शेअर केला नाही, असा दावा श्रोत्रिय यांनी तक्रारीत केला आहे. घटनेनंतर त्यांनी तत्काळ बँकेशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. तरीही ८ जून राेजी त्यांना क्रेडिट कार्डचे बिल अाले. त्यानंतर त्यांनी मुकुंदवाडी पाेलिसांकडे तक्रार दिली. तपास पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर करत आहेत.

फ्री गेम, अनोळखी अॅपला परमिशन देणे टाळा

  • सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे-आरवडे म्हणाल्या, प्रत्यक्षात ओटीपी शेअर केलेला नसला तरी मोबाइलमधील अॅपला आपण नकळत अनेक परमिशन देत असतो. इंटरनेटवरील अनेक अॅपची पहिली अटॅच ‘ऑटो रीड ओटीपी’ असते. त्यामुळे थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार परस्पर त्या ओटीपीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात प्रवेश करतात.
  • अनोळखी गेम, ऑनलाइन पेमेंट अॅप्लिकेशनच्या माध्यमातून असे बहुतांश प्रकार घडतात. बँकेला पत्रव्यवहार केल्यानंतर ओटीपी शेअर केला अाहे की नाही हे स्पष्ट होते. मात्र, नागरिकांनी स्वत: व मुलांनी मोबाइलमध्ये अनोळखी अॅप, गेम अॅप इन्स्टॉल करणे टाळले पाहिजे. इन्स्टॉल केल्यास त्यांना अनावश्यक परवानगी देणे आवर्जून टाळा, असे बागवडे म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...