आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • No Food For Two Or Three Days; Finally Returning To India From The Hungarian Border, Three Students From Jalna Returned Safely From Ukraine | Marathi News

औरंगाबाद:दोन ते तीन दिवस जेवणही मिळाले नाही; अखेर हंगेरी बॉर्डरवरून भारतात परतलो, जालन्याचे तीन विद्यार्थी युक्रेनहून सुखरूप परतले

औरंगाबाद / प्रवीण ब्रह्मपूरकर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यापासून भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातून वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी जीव मुठीत घेऊन बंकरमध्ये लपून बसले आहेत. सुमारे ५०० मुले युक्रेनमधून हंगेरी बाॅर्डरवर पाेहाेचली आहेत. त्यातील जालना जिल्ह्यातील तीन मुले रविवारी सायंकाळी ७ वाजता चिकलठाणा विमानतळावर आली. मुले सुखरूप आल्याचे पाहून पालकांच्या डाेळ्यात अश्रू आले.

गणेश पंडित यांचा मुलगा तेजस, शंकर धनवई यांचा मुलगा सुयोग आणि दिनकर उखर्डे यांचा मुलगा संकेत हंगेरीतून दिल्ली अन् तेथून औरंगाबादला पाेहाेचले. तेजसचा भाऊ शुभम हा अजूनही युक्रेनमध्येच आहे. मात्र, भाऊ सुखरूप गावी पाेहाेचल्याने आनंद झाल्याचे त्याने दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. मुलांना घेण्यासाठी त्यांचे आई-वडील, नातेवाईक विमानतळावर आले हाेते. त्यांनी मुलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

युक्रेनहून जालन्याचे विद्यार्थी परत आले. त्यांचे स्वागत करताना पालक.‎
युक्रेनहून जालन्याचे विद्यार्थी परत आले. त्यांचे स्वागत करताना पालक.‎

सर्वात कठीण अनुभव : सुयोग म्हणाला, माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण अनुभव होता. दोन-तीन दिवस जेवणही मिळाले नाही. आम्ही वुझहेर्डमध्ये होतो. तेथून हंगेरीच्या बॉर्डरवर गेलो. तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आम्ही राहत असलेल्या भागात हल्ले कमी हाेत असले तरी तणाव प्रचंड आहे.

आम्ही तणावातून मुक्त झालो
शंकर धनवई म्हणाले, मुलगा सुखरूप आल्याचे पाहून आम्ही तणावातून मुक्त झालो. तीन दिवस टीव्हीवर युद्धाच्या बातम्या पाहत हाेताे. दर अर्ध्या तासाला मुलाला फोन करत होतो. गणेश पंडित यांनी सांगितले की, माझी दोन्ही मुले युक्रेनमध्ये असल्यामुळे आमचे कुटंुब भयभीत झाले हाेते. माझा एक मुलगा आला, दुसरा अजून युक्रेनमध्येच आहे. त्याची चिंता वाटतेय. दिनकर उखर्डे म्हणाले, मी तीन दिवस झोपलाे नाही. मुलगा कधी येईल याचीच चिंता होती.

भारतीय दूतावासाकडून नेण्याचे आश्वासन
शुभम पंडितने सांगितले, हंगेरी बॉर्डरवर जवळपास पाचशे भारतीय ताटकळत थांबले आहेत. माझा भाऊ आैरंगाबादला पोहोचल्यामुळे मी आनंदी आहे. भारतीय दूतावासाने सोमवारी तुम्हाला येथून घेऊन जाऊ, असे आश्वासन दिले आहे.

३० किमी पायपीट करून पाेलंड सीमेवर
औरंगाबादची भूमिका शार्दूल ही ३० किमी पायी प्रवास करून पोलंडच्या सीमेवर पाेहाेचली. मात्र, पोलंडच्या सीमेवर केवळ युक्रेनच्या नागरिकांनाच प्रवेश दिला जात होता. त्यामुळे भारतीय दूतावासाने त्यांना पुन्हा होस्टेलवर परत जाण्याच्या सूचना दिल्यामुळे ती परत होस्टेलमध्ये गेल्याची माहिती तिचे वडील रोहिदास शार्दूल यांनी दिली.

मी परतलाे, आता भावाची प्रतीक्षा : तेजस आणि त्याचा माेठा भाऊ शुभम पंडित हे एमबीबीएसच्या शिक्षणासाठी युक्रेनला गेले होते. सध्या शुभम हंगेरी बॉर्डरवर थांबला आहे. तेजस म्हणाला, आम्ही तीन दिवस घराच्या बाहेर निघालाे नाही. शेवटी विद्यापीठाने बसने हंगेरी बाॅर्डरवर आणून साेडले. संकेत म्हणाला, बॉम्बस्फोटामुळे खूप भीती वाटत होती. भारतात कधी पाेहाेचताे याची चिंता हाेती.

बातम्या आणखी आहेत...