आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 45 दिवसांत 137 शेतकऱ्यांची आत्महत्या:40 टक्क्यांपर्यंत सावकारी कर्ज आणि अतिवृष्टीमुळे रोज सरासरी तीन आत्महत्या

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्य मराठी प्रयोग । सरकारकडून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या 137 शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असलेले हे 30 चेहरे  - Divya Marathi
दिव्य मराठी प्रयोग । सरकारकडून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या 137 शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असलेले हे 30 चेहरे 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलैला कृषी दिनानिमित्ताने त्यांचा पहिला संकल्प जाहीर केला - महाराष्ट्र आत्महत्यामुक्त करू - त्याच वेळी परभणीतील काष्टगावचे पुरुषोत्तम बोचके, जालन्यातील जायखेड्याचे बबन राठोड आणि औरंगाबादच्या लासूरचे अंकुश मालकर या तीन शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं होतं.

दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 7 असे करता करता 24 जुलैला हा आकडा 89 च्या घरात गेला आणि मुख्यमंत्री देशाचा अमृतमहोत्सव साजरा करीत होते तेव्हा राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा 137 च्या घरात गेला आहे. म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी संकल्प जाहीर केल्यानंतर आत्महत्यामुक्ती दूर, दर दिवशी दोन ते तीन शेतकरी मरणाला कवटाळत आहेत. मागील दीड महिन्यातील राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा ‘दिव्य मराठी’ टीमने आढावा घेतला असता, नेहमीच्या गळफास आणि तणनाशक पिऊन आत्महत्या करणाऱ्यांसोबतच विहिरीत आणि तळ्यात उडी मारून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. कारण अर्थातच, अतिवृष्टीने चिखल झालेलं शेतातलं पीक आणि 36-40 टक्के व्याजाने खासगी सावकारांकडून काढलेल्या कर्जाची टांगती तलवार हेच.

बहुतांश शेतकऱ्यांची बँकांच्या कर्जांची थकबाकी. त्यानंतर यंदाच्या खरिपातील पेरणीसाठी खासगी सावकाराकडून पुन्हा एक कर्ज काढलेलं. हंगामानंतर ते फेडू या आशेनं. पण जुलैच्या पावसानं उगवलेल्या पिकाचा चिखल झाला आणि उरलीसुरली आशा संपल्याने या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातलगांनी सांगितले. यातील सर्वाधिक आत्महत्या मराठवाडा आणि विदर्भातील आहेत.

औरंगाबाद, बीडसोबत यावेळी सर्वाधिक आत्महत्या झाल्यात त्या नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातही. पोलिसांच्या प्रत्येक एफआयआरमध्ये आकस्मिक मृत्यू असाच उल्लेख एकाही एफआयआरमध्ये सावकारी कर्ज किंवा बँकांच्या तगाद्याचा उल्लेख नाही. पंचनाम्यात फक्त यासंदर्भात ओझरता उल्लेख करण्यात आला आहे. सर्व आत्महत्यांची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पडताळणीत आढळून आले. यासाठी मागील दीड महिन्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या काही एफआयआरची पडताळणी केली गेली.

बातम्या आणखी आहेत...