आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात सोमवार पासून लॉक डाऊन लागणार असल्याचे वृत्त पसरल्यानंतर अनेकांची तारांबळ उडाली होती. याबाबत दिव्य मराठीने यात अधिक माहिती घेतली असता, सोमवारी लॉक डाऊन लागणार नसल्याचे समोर आले. रविवारी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जिल्हा टास्क फोर्सची बैठक आयोजित केली. त्यात सर्व बाबींवर चर्चा करुनच निर्णय होणार आहे. लॉक डाऊन लागणार असल्याचे निश्चित असले तरी, तो पुढील आठवडयात लागणार असल्याचे समोर आले.
गेल्या तीन आठड्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्याावर निर्बंध घालण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र दुसरीकडे नागरिकांनी नियमांचे पालन केले नसल्याने लॉक डाऊनची नामुष्की ओढवण्याची वेळ आल्याचे सुत्रांनी सांगितले. शनिवारी सकाळपासून शहरात सोमवार पासून लॉक डाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याची जोरदार चर्चा होती. तसेच काही माध्यमांमध्येही त्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली होती. तसेच काहींनी तर बाजारात आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दीही केली होती.
नियम पाळले नसल्याने लॉक डाऊन लागणार असल्याची जाणीव असूनही शनिवारीही नागरिकांनी मास्क वापरने टाळले असल्याचा प्रकार दिसून आला. जिल्हाधिकारी रविवारपर्यंत रजेवर आहेत. उद्या शहरात आल्यावर टास्क फोर्सची बैठक घेऊन लॉक डाऊनवर चर्चा करणार आहे. त्यानंतरच त्याचा वार आणि कालावधी, वेळ आणि भाग निश्चित होणार आहे.
लोकांची मानसीकता तयार करण्याचा प्रयत्न अचानक लॉक डाऊन लावल्यानंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण होऊ शकते. पुढील आठवड्यात लाॅक डाऊन लागणार आहे. नागरिकांची मानसिकता तयार करण्यासाठी हा प्रयत्न केला. मात्र काहींनी थेट सोमवारी लागणार असल्याचे चित्र निर्माण केल्याने शहरात नागरिक धास्तावले.
टास्क फोर्समध्ये यांचा समावेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय, पोलिस आयुक्त निखील गुप्ता, जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोदावले, शासकीय महाविद्यालय अधिष्टाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन उपजिल्हाकारी आदींचा त्यात समावेश आहे.
या बाबींचा विचार होणे आवश्यक
लॉक डाऊन आवश्यक आहे का? लॉक डाऊन लागल्यास पूर्ण शहर आणि परसिरात लावावा किंवा जेथे रुग्ण जास्त आहे, त्या भागात लावने योग्य राहिल. रुग्णांचा चढता आलेख. कोणत्या वयोगटाचे रुग्ण? कोणत्या भागातील सर्वाधिक रुग्ण आहेत? तसेच कोणत्या आस्थापना सुरू ठेवणे आवश्यक आहे. कोणत्या बंद कराव्यात? दहावी आणि बारावीचे वर्गाचे काय करावे? शासकीय कार्यालये ? खासगी अत्यावश्यक सेवा? वर्तमानपत्र कार्यालये? शहरातील बस सेवा? बाहेरुन शहरात येणाऱ्या बसेसचे प्रवासी? रेल्वे प्रवासी ? दवाखाण्यात येणारे रुग्ण? किराणा, दुध, भाजीपाला यांचे काय नियोजन करणार? एमआयडीसी मधील कारखाने व त्यातील कामगारांचे नियोजन? या कालावधीत होणारे मंगल कार्य,लग्न व इतर सोहळे, समारोह, परीक्षा याबाबत चर्चा अंती निर्णय होईल.
त्याच बरोबर जिम, क्लासेस आदी बाबत चर्चा होईल. तसेच शहरातील कंटेनमेंट झोन तयार करुन तेथे सील करणे, पूर्ण भाग सिल करणे, नागरिकांना रस्त्यावर येण्यास मनाई करणे आदींबाबतही चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
किती दिवसांचा लॉकडाउन हे निश्चित नाही
सद्या दहा दिवसांचा लॉक डाऊन घेण्याची चर्चा पसरवण्यात येत आहेत. मात्र परिस्थिती बघून दहा दिवसांचा, सात दिवसांचा अथवा पंधरा दिवसांचा लॉक डाऊन घेण्यावरही उद्याच होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लॉक डाऊन लावणेसदृश्य स्थिती आहे. मात्र यावर टास्क् फोर्स मध्ये अगोदर चर्चा होईल. त्यानंतरच नेमका कधी ? कुठे? किती दिवसांचा लॉक डाऊन घ्यायचा किंवा नाही यावर निर्णय होईल. याबाबत आताच भाष्ट करु शकत नाही. लोकांना त्रास देण्यासाठी प्रशासनाकडून निर्णय घेणार नाही. तसेच लॉक डाऊनला सामोरे जाण्यासाठी आवश्यक पूर्व तयारी करण्यासाठी नागरिकांना वेळ दिल्या जाईल. (अस्तिक कुमार पांडेय, मनपा प्रशासक)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.