आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेआधी आम्हाला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप भाजप आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. मात्र, आम्ही कुणालाही नजरकैदेत ठेवले नाही, असे स्पष्टीकरण औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिले.
सकाळपासून पहारा
भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले की, सकाळपासून माझ्या कार्यालयाखाली पोलिसांचा पहारा आहे. मुख्यमंत्र्यांची सभा असल्यामुळेच आमच्यासोबत असा प्रकार केला जात आहे. भाजपचे माजी नगरसेवक शिवाजी दांडगे म्हणाले की, पोलिस आमच्या हालचाली टिपत असून ते आमच्यावर नजर ठेवून आहेत.
पोलिसांचा ससेमिरा
मनसेचे जिल्हाप्रमुख सुमीत खांबेकर म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी आम्हाला नजरकैदेत ठेवण्यात आले. आमच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लावला आहे. पोलिसांचा याच्याशी संबंधच नाही, पण त्यांना राज्य सरकारकडून सूचना असल्यामुळेच आमच्यासोबत असा प्रकार सुरू आहे. सरकार आम्हाला एवढे का घाबरत आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.
दडपशाहीला घाबरणार नाही
सुमीत खांबेकर पुढे म्हणाले की, शिवसेनेने या सभेला स्वाभिमान सभा नव्हे, तर स्वार्थी सभा हे नाव द्यायला हवे. ज्या लोकांनी सत्तेसाठी काॅंग्रेससोबत आघाडी केली. त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नये. शिवसेनेने आपले मंंत्री अब्दुल सत्तार यांना सांगावे की, या शहराचा उल्लेख औरंगाबाद न करता संभाजीनगर करावा. कारण अब्दूल सत्तार हे सातत्याने या शहराचा उल्लेख औरंगाबाद असा करतात. ते जाहीरपणे सांगतात की, मला विशेष परवानगी दिली आहे. म्हणून आमची भूमिका आहे की, शिवसेनेने त्यांचे मंत्री अब्दुल सत्तार यांना आधी सांगावे की, शहराचा उल्लेख संभाजीनगर करावा. आपल्या स्वार्थापोटी फक्त शहराचे संभाजीनगर असे नाव वापरायचे किंवा स्वार्थापोटी शहरात राजकारण करायचे हे शहरवासीयांना समजले आहे. येत्या निवडणुकीत शिवसेनेला जनता त्यांची जागा दाखवणार आहे.
पोलिसांनी दावा फेटाळला
औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता 'दिव्य मराठी'शी बोलताना म्हणाले की, कोणत्याच नेत्याला अथवा पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले नाही. जर त्यांना नजरकैदेत ठेवले असते, तर त्यांनी माध्यमांना काॅल कसा केला, असा उलट सवालही त्यांनी केला. शहरात सभेनिमित्त चोख बंदोबस्त ठेवला. बस्स एवढेच, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.