आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीव्र नाराजी:ब्रेक द चेन नव्हे, हा तर कडक लाॅकडाऊन; व्यापारी संतप्त, राज्यभरात विराेध-निदर्शने

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
नागपुरात मंगळवारी संतप्त व्यापारी रस्त्यावर उतरले होते. जमावबंदी असूनही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे व्यापारी-पोलिसांमध्ये संघर्ष उडाला. - Divya Marathi
नागपुरात मंगळवारी संतप्त व्यापारी रस्त्यावर उतरले होते. जमावबंदी असूनही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे व्यापारी-पोलिसांमध्ये संघर्ष उडाला.
  • मुंबई, पुणे, सातारा, नागपुरात व्यापारी रस्त्यावर; भाजप, मनसेचाही विरोध

‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली कडक लॉकडाऊन लादल्याचे तीव्र पडसाद पहिल्याच दिवशी राज्यभरात उमटले. मुंबई, पुणे, नागपूर येथे छोटे दुकानदार, व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून विरोध सुरू केला असून अत्यावश्यक सेवेतील दुकानांप्रमाणे आठवड्यातील ५ दिवस इतर दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. राज्यभरात व्यापाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली.

मुंबईत बोरिवली, भेंडी बाजार परिसरातील दुकानदारांनी मंगळवारी जोरदार निदर्शने केली. पुण्यात लक्ष्मी रोड, तुळशीबाग परिसरातील दुकानदारही रस्त्यावर उतरले होते. नागपुरात गांधीबाग, जरीपटका भागातील व्यापाऱ्यांनीही उग्र निदर्शने करीत दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली. दरम्यान, येत्या दोन दिवसांत राज्य सरकारने कडक निर्बंध मागे घेतले नाही तर शुक्रवार, ९ एप्रिलपासून व्यापारी आपली दुकाने सुरू करतील, असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर संघटनेने दिला आहे.

८ एप्रिल सायंकाळपर्यंत राज्य सरकारने निर्णय घ्यावा : मंडलेचा
औरंगाबाद | महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर संघटनेचे अध्यक्ष संताेष मंडलेचा व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी व व्यापारी सभासदांची आॅनलाइन बैठक घेतली. या वेळी ३०० पेक्षा अधिक सदस्य उपस्थित होते. ८ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरकारने निर्बंध उठवण्याबाबत निर्णय घेतला नाही तर ९ एप्रिलला व्यापार सुरू करणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मंडलेचा यांनी दिली.

अघोषित लॉकडाऊनमुळे तीव्र नाराजी : देवेंद्र फडणवीस
ज्या प्रकारचे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आलेत, ते पाहता हा एक प्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाऊनच आहे. छोटे दुकानदार, छोटी हॉटेल्स, केशकर्तनालये अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक होते. यामुळे तीव्र नाराजी पसरली आहे, असे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. अघोषित लाॅकडाऊनला मनसेनेही विरोध केला आहे.

महाराष्ट्रातील महिनाभराच्या लॉकडाऊनमुळे देशाचे ४० हजार कोटींचे नुकसान
नवी दिल्ली | महाराष्ट्रातील जवळपास महिनाभराच्या लॉकडाऊनमुळे देशाला ४० हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचा अंदाज केअर रेटिंग्ज या पत मानांकन संस्थेने वर्तवला आहे. याचा सर्वाधिक फटका व्यापार, हॉटेल आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्राला बसेल. यामुळे देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नात (जीडीपी) मध्येही १०.७ पर्यंत घट होण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात यंदा जीडीपी ११ ते ११.२ टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

सुधारित आदेश काढण्याची पुणे व्यापारी संघटनेची मागणी
पुणे |कोरोनामुळे वर्षभरात तीस टक्के व्यापारसुद्धा शिल्लक राहिला नाही. त्यामुळे दुकाने सुरू ठेवण्यासंदर्भात सुधारित आदेश काढण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती पुणे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय मुनोत आणि उपाध्यक्ष प्रकाश रांका यांनी दिली आहे.

सगळे सुरू, मग दुकाने बंद का? मुंबईच्या व्यापाऱ्यांचा सवाल
किराणा, दूध, भाजीपाला याच्या व्यापाऱ्यांना दुकाने उघडे ठेवण्यास संमती आहे. रेल्वे, रिक्षा, एसटी, बस चालू आहे. आम्ही सर्व कोरोनाचे नियम पाळायला तयार आहोत. त्यामुळे आठवड्यातील ५ दिवस आमची दुकाने खुली ठेवण्याची संमती द्यावी, असे मुंबईतील व्यापारी असोसिएशनचे हितेश ओझा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...