आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सेनेवर टीका न करणे ‘राज’नीतीचा भाग; 1 मेच्या जाहीर सभेबाबत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादेत जाहीर सभा झाली, त्याला प्रतिसादही उत्स्फूर्त मिळाला. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या औरंगाबादेत राज ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर टीका करतील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून बांधला जात होता. मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांचा समाचार घेतलाही मात्र राज ठाकरेंनी ना शिवसेनेचे नाव घेतले ना उद्धव ठाकरेंचे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘दिव्य मराठी’ने जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन म्हणाले, प्रत्येक सभेत राज ठाकरेंनी शिवसेनेवर बोलावेच असा नियम नाही. ज्या मुद्द्यावर ही सभा आयोजित केली होती. त्याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी भाषण केले.’ तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही फारसे बोलणे टाळले. ‘हे त्यांचे भाषण आहे, काय बोलावे हे त्यांनी ठरवावे, त्यावर आम्ही काय बोलणार?’ एवढेच उत्तर खैरेंनी दिले.

शिवसेनेवर टीका करणे लोक स्वीकारत नाहीत : काँग्रेस
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे म्हणाले, ‘मुंबईत राज यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. पण ठाकरे परिवाराच्या विरोधात बोलल्यामुळे लोकांनी त्यांना स्वीकारले नाही. त्यामुळे औरंगाबादेत त्यांनी शिवसेनेबद्दल शब्द काढला नसावा. मुंबईत नवनीत राणा कुटुंबानेही ठाकरेंवर केलेली टीका लाेकांनी स्वीकारली नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या परिवाराचे वलय लोकांना मान्यच आहे.

राज ठाकरेंनी महागाईबद्दल बोलणे अपेक्षित होते. पण केंद्राचे अपयश झाकून ठेवण्यासाठी भोंगे, हनुमान चालिसा हा विषय त्यांनी घेतला. भाजपच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी त्यांची ही सभा होती.’

बातम्या आणखी आहेत...