आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनींनी व्यक्त केली नागरिकांकडून अपेक्षा:जी-20 परिषदेपुरतेच नव्हे, तर शहर कायम स्वच्छ-सुंदर ठेवावे

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात झालेल्या जी-२०, डब्ल्यू-२० परिषदेमुळे जागतिक स्तरावर छत्रपती संभाजीनगरचे नाव आज पोहाेचले आहे. पर्यटनस्थळ, ऐतिहासिक ठिकाणांचा सुंदर असा वारसा आपल्या शहरात आहे. त्यांची सुरक्षितता आणि स्वच्छता ही केवळ परदेशी पाहुण्यांच्या परिषदेपुरतीच न होता कायम राखली पाहिजे. याची जबाबदारी केवळ प्रशासनाचीच नव्हे, येथील नागरिकांचीदेखील आहे. तेव्हा इकडे तिकडे थंुकू नका, कचरा टाकू नका, उद्याचे भविष्य म्हणून आपणही आपला खारीचा वाटा शहराच्या विकासासाठी उचलूयात, अशी अपेक्षा शनिवारी शारदा मंदिर कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींच्या अभिरूप जी-२०, डब्ल्यू-२०, ई-२० च्या विद्यार्थिनींनी व्यक्त केली.

स.भु. शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी येथे शनिवारी सकाळी आठवी व नववीच्या विद्यार्थिनींची मिळून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभिरूप जी-२०, डब्ल्यू-२०, ई-२० परिषद घेण्यात अाली. या वेळी २० विद्यार्थिनींच्या पॅनलने जी-२०, डब्ल्यू-२०, ई-२० याची माहिती दिली. यासाठी स्वत: विद्यार्थिनींनी शहरात फिरून व्हिडिओ करत स्थळांची माहिती संकलित केली. समोर प्रेक्षक म्हणून बसलेल्या वर्गमैत्रिणींनी प्रश्न विचारले. आरोग्य, पर्यावरण, शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. भारतीय संस्कृतीचे, खाद्यसंस्कृतीचे दर्शन यानिमित्ताने परदेशी पाहुण्यांना करून दिले. या परिषदेच्या निमित्ताने का होईना शहर सुंदर ठेवण्याचे महत्त्व सर्वांना कळाले.

शहरातील ऐतिहासिक स्थळे, शहर पर्यटन राजधानी आहे हे सिद्ध करण्याची संधी मिळाली. महिला सक्षमीकरण, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य याचा जवळचा संबंध अर्थकारणाशी आहे. तेव्हा आपण आपल्या शहराच्या विकासासाठी परिषदेच्या निमित्ताने झालेला बदल कायम ठेवूयात. वृक्षारोपण करत त्यांचे संवर्धन करू, ऐतिहासिक स्थळांच्या भिंती काहीही लिहून खराब होणार नाहीत याची काळजी घेऊ. ते कसे तर शिक्षणाच्या माध्यमातून अशी अपेक्षा सर्व विद्यार्थिनींनी व्यक्त केली.

कर्तव्य पार पाडण्याचा संकल्प : “मी आतापासून माझे घर, माझ्या शहराचा परिसर, माझी शाळा, माझा वर्ग कायम स्वच्छ, संुदर ठेवण्यासाठी कटिबद्ध राहील. हे शेजाऱ्यांना, शहरवासीयांना, मैत्रिणांनादेखील सांगणार आहे. याची सुरुवात स्वत:पासून करणार आहे,’ असा संकल्पही शिक्षक, विद्यार्थिनींनी केला.

मुलींना माहिती व्हावी शहरात नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेच्या अनुषंगाने नेमकी ही परिषद का आयोजित केली, तिचा काय उद्देश होता, इतकी वर्ष येथे राहतो आहे, पण स्वच्छता-रस्ते चांगले नव्हते. शहरातील जागोजागी भिंतींची रंगरंगोटी करत सुशोभीकरण केलेे होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसादेखील खर्च केला. तो कशासाठी याची माहिती विद्यार्थिनींना व्हावी या हेतूने ही परिषद घेतल्याची माहिती मुख्याध्यापिका सविता मुळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...