आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:युनिव्हर्सल हायस्कूलला प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

युनिव्हर्सल हायस्कूलने पुस्तके, शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केल्याचा आरोप करत १२ पालकांनी प्राथमिक शिक्षण विभागात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे वारंवार येणाऱ्या पालकांच्या तक्रारींची दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी खुलासा करण्यासाठी मुख्याध्यापकांना नोटीस बजावली आहे. शाळेच्या वतीने लेखी खुलासा सादर न केल्यास आपले काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे चव्हाण यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.

मागील दोन वर्षांपासून पालकांच्या विविध तक्रारी शिक्षण विभागास सातत्याने प्राप्त होत आहेत. यात युनिव्हर्सल हायस्कूल शासनाच्या नियमांचे पालन करत नसल्याचे तक्रारीवरून लक्षात आले आहे. पुस्तके, शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची शाळेकडून सक्ती केल्याचे पालकांनी म्हटले आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही वर्षभर विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली नाही. शाळेने निवडलेली पुस्तके औरंगाबादेतील पुस्तकांच्या दुकानात उपलब्ध नाहीत. या सर्व मुद्द्याच्या अनुषंगाने पुराव्यासहित ३० दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करावा, असे चव्हाण यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे. याबाबत युनिव्हर्सल हायस्कूलचे प्रशासकीय अधिकारी कल्पेश पळसमकर यांना विचारले असता ते म्हणाले की, शिक्षण विभागाने पाठवलेली नोटीस अद्याप आमच्यापर्यंत आली नाही. आमची शाळा विनाअनुदानित आहे. गेल्या दोन वर्षांपासून पालकांनी फी भरलेली नाही. त्यामुळे शाळा कशी चालणार? तसेच, आम्ही शालेय साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची कुणालाही सक्ती केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...