आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षेची काळजी:आता औरंगाबादेतील 418 ठिकाणांवर राहणार 700 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्मार्ट सिटीच्या निधीतून पाेलिस आयुक्तालयात उभारले कमांड कंट्राेल

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, वाहतूक कोंडी, मोर्चा, दंगल किंवा इतर कुठल्याही आणीबाणीच्या परिस्थिती पोलिस यंत्रणा तत्काळ घटनास्थळी पोहोचावी यासाठी शहरातील ४१८ ठिकाणी ७०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या निधीतून १७६ कोटी खर्च करण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याचे फुटेज पाहण्यासाठी पोलिस आयुक्तालयात स्वतंत्र कमांड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलिस ठाण्यातदेखील कॅमेऱ्याचे फुटेज त्यांना पाहता येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मास्टर सिस्टिम इंटिग्रेडर (एमएसआय) प्रकल्पांतर्गत हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शहर सुरक्षेच्या दृष्टीने एमएसआय प्रकल्प स्मार्ट सिटी अभियानात सहभागी झालेल्या सर्वच शहरांना राबवणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननेदेखील या प्रकल्पाचे काम हाती घेतले. या उपक्रमांतर्गत मनपा मुख्यालयात ऑपरेशन कमांड अँड कंट्रोल सेंटर, पोलिस व्हिव्हिंग सेंटर, डेटा सेंटर उभारणीच्या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्याची माहिती एमएसआय प्रकल्पाचे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे प्रकल्प व्यवस्थापक फैज अली यांनी दिली. या वेळी अलाइड डिजिटल सर्व्हिसेसचे प्रकल्प व्यवस्थापक आशिष शर्मा, अर्पिता शरद उपस्थित होत्या.

सहाशे फिक्स, तर शंभर फिरते कॅमेरे : शहरात सातशेपैकी सहाशे फिक्स कॅमेरे असून शंभर फिरते कॅमेरे आहेत. त्यांना पीटीझेड कॅमेरे म्हणतात. पोलिस विभागाकडून केलेल्या सूचनेनुसार ४१८ जंक्शनवर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यासाठी ४१८ खांब उभारले असून सुमारे १५० किलोमीटरचे केबल टाकले आहे. केबल टाकण्याचे काम बीएसएनएलने केले आहे. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील १४ पोलिस स्टेशनमधील बहुतेक सर्व विभाग सीसीटीव्हीने एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. १७० चौरस किलोमीटरचा परिसर सीसीटीव्हीच्या टप्प्यात आला आहे. पोलिस आयुक्त कार्यालयात कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारले असून ते कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सेंटरमध्ये २० कर्मचारी नियुक्त केले आहेत. हे सेंटर मनपा मुख्यालयात उभारण्याचे काम सुरू असून तेथेही १५-२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.

अधिक गर्दी झाल्यास कंट्रोल रूममध्ये वाजताे अलार्म
कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेल्या घटना पोलिस आयुक्तालयातील कंट्रोल सेंटरमध्ये मोठ्या स्क्रीनवर पाहता येतात. यात विविध चौकात वेगवेगळे फिल्टर वसवण्याची सुविधा आहे. बेवारस वस्तू, अधिक गर्दी झाल्यास कंट्रोल रूममध्ये तत्काळ अलार्म वाजतो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला शोधायचे असल्यास त्याचे वर्णन अपलोड केल्यास कॅमेरा ती व्यक्ती दिसल्यास कंट्रोल रूममध्ये तत्काळ अलार्म वाजतो. एमएसआय प्रकल्पाचे मूळ काम केईसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला मिळाले आहे. याबरोबर असाइड डिजिटल सर्व्हिसेस, समर्थ इंजिनिअर सिंग आणि बीएसएनएल या कंपन्यांनी काम केले आहे. या कॅमेऱ्यांमुळे मंगळसूत्र चोरी किंवा इतरही गुन्ह्यांच्या तपासात मदत मिळाल्याचे सहायक पोलिस निरीक्षक बोंडेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...