आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायूपीएससी परीक्षेचे कारण देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ उडाला होता. विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी दिल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. दस्तूरखुद्द उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गंभीर दखल घेऊन फेरपरीक्षाचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.
जिल्हाधिकाऱ्यांना हवे परीक्षा केंद्र
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विद्यापीठाला पत्र पाठवून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याचे कळवले आहे. रविवारी, 5 जून रोजी ही पूर्व परीक्षा होणार असून, त्यासाठी जिल्हाधिकार्यांनी 4 जून रोजी परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे विद्यापीठाने 4 जून रोजी होणारी परीक्षा रद्द केली आहे. एक पेपर रद्द केल्यामुळे पुढील सर्वच पेपरच्या तारखांमध्ये फेरबदल होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी एक परिपत्रक जारी केले असून, त्यात सर्व पदवी परीक्षा पुढे ढकलल्याचे कळवले आहे.
पुढील तारखा कळवू
दिव्य मराठी प्रतिनिधीने प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट यांच्याशी संवाद साधला असता. ते म्हणाले, ' जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार चार तारखेचा पेपर रद्द केला आहे. पदवी परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल.
केंद्रावर 466 परीक्षार्थीची बैठक व्यवस्था
विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर गुरुवारी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स (BCS), बीएस्सी कम्प्युटर सायन्स (B.sc. compu) आणि बीएससीच्या डेटा स्ट्रक्चर आणि सॉफ्टवेअर कॉलिटी अँड टेक्निक्स या विषयांचा पेपर होता. प्रारंभी या केंद्रावर 466 परीक्षार्थीची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. तशी यादी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने परीक्षा केंद्राला दिली होती.
विद्यार्थ्यांचा परीक्षा केंद्रावर आरडा-ओरडा
मात्र, काबरा समाजकार्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर अचानक 860 विद्यार्थी वाढवण्यात आले होते. या विद्यार्थ्यांची नावे यादीत नव्हते पण त्यांच्या प्रवेशपत्रावर विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय परीक्षा केंद्र असल्याचा उल्लेख होता. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या संचालकाने गेटच्या बाहेर उभे केले होते. नऊ वाजेचा पेपर असताना दहा वाजले तरी आत सोडले जात नसल्याने सर्वच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर आरडा-ओरड सुरू केली होती.
परीक्षा विभागाने सर्व विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्याचे सूचवले होते. मग एकूण 1326 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या केंद्राची क्षमता सातशे-आठशे विद्यार्थ्यांची होती. त्यामुळे एका बेंचवर तीन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या घटनेची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गंभीर दखल घेतली होती. सर्व विद्यार्थ्यांची फेर परीक्षा घ्यावी असे निर्देश त्यांनी विद्यापीठाला दिले होते. विद्यापीठाला परीक्षांचे नियोजन करण्यासाठी आता आणखी तीन दिवसांचा वेळ मिळाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.