आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी मुलाखत:आता एमपीएससीचे विद्यार्थी यूपीएससीही करतील क्रॅक; सादिक बागवान यांना विश्वास

औरंगाबाद | डॉ. शेखर मगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरेतील राज्यांनी राज्य सेवा व यूपीएससी पॅटर्न १५ वर्षांपूर्वी समान केला. तेथील उत्तीर्णांचे प्रमाण जास्त आहे. आता आपल्याकडेही बदल झालाय. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थीही उत्तरेत ‘यूपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकतील,’ असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्री-आयएएस कोचिंग सेंटरचे संचालक सादिक बागवान यांनी ‘दिव्य मराठी’च्या मुलाखतीत व्यक्त केले.

प्रश्न : यूपीएससीत मराठी टक्का कमी का असतो ?
बागवान : पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहारसह उत्तरेतील राज्यांमध्ये १५ ते २० वर्षांपासून यूपीएससी आणि तेथील राज्य सेवा आयोगाचा अभ्यासक्रम सारखाच आहे. त्यामुळे उत्तरेतील राज्यांचे यूपीएससीत प्रतिनिधित्व जास्त असते. तेथील उमेदवार उत्तीर्ण होण्याचा टक्का जास्त असतो. आता आपल्याकडेही एमपीएससीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. खरे तर त्याला उशिरच झालाय. पण आता तरी या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल. यूपीएससी परीक्षेत मराठी युवकांचा टक्का वाढू शकेल.

प्रश्न : काय बदल झालाय?
बागवान : मराठी व इंग्रजी विषयाचे ज्ञान तपासण्यासाठी ही परीक्षा आहे. बदललेल्या पॅटर्ननुसार त्यात प्रत्येक विषयाचे गुण अशी एकूण ६०० गुणांची परीक्षा होईल. उमेदवाराने या दोन्ही पेपरमध्ये प्रत्येकी किमान ७५ गुण घेणे अनिवार्य असेल. किमान ७५ गुण घेणाराच पुढील टप्प्यात अनिवार्य आणि वैकल्पिक पेपर देण्यासाठी पात्र ठरु शकेल.

प्रश्न : एमसीएससीच्या सर्वच परीक्षांना बदल लागू असेल?
बागवान : नाही... सर्व परीक्षांसाठी हा बदल नसेल. फक्त वर्ग एक गट अ आणि गट ब साठीच नवा पॅटर्न लागू करण्यात आलेला आहे. म्हणजेच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक, सहायक आयुक्त आदी पोस्टसाठीच अभ्यासक्रम बदलला आहे. उपजिल्हाधिकारी होण्यासाठी तयारी करणारा आता जिल्हाधिकाऱ्याची परीक्षा देऊ शकेल, किंवा जो उमेदवार जिल्हाधिकारी होण्यासाठी अभ्यास करत असेल, तो उपजिल्हाधिकाऱ्याची परीक्षा देऊन पास होऊ शकतो.

प्रश्न : एमपीएससी, यूपीएससी दोन्हीमध्ये काय फरक होता?
बागवान : एमपीएससी परीक्षेची प्रश्नपत्रिका पूर्वी ’बहुपर्यायी’ होती. तर यूपीएससी वर्णनात्मक प्रश्नांतून परीक्षार्थींचे लिखाण, कल्पनाशक्ती तपासत होती. आता एमपीएससी परीक्षेतही वर्णनात्मक लिखाणाचे प्रश्न ठेवण्यात येणार आहेत.

प्रश्न : एमपीएसीसाठी गुणांकन कसे असेल..?
बागवान : मराठी आणि इंग्रजीत ६०० पैकी १५० गुण उत्तीर्ण होण्यासाठी लागतील. त्यानंतर गुणवत्ता यादीसाठी पाच पेपर आहेत. त्यात मराठी आणि इंग्रजीत निबंध लिहावा लागेल. त्याासाठी २५० गुण आहेत. जनरल स्टडीजचे १ ते ४ पेपर असतील. या पेपरलाही प्रत्येकी २५० गुण आहेत. या पाच पेपरचे १२५० गुण आहेत. मग, वैकल्पिक विषय क्रमांक-१ आणि २ आहेत. दोन्ही विषयांना प्रत्येकी २५० गुण आहेत. याची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीला २७५ गुण आहेत. एकूण २०२५ गुणांची परीक्षा असते. यातून टॉपर काढले जातात.

बातम्या आणखी आहेत...