आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूर्वीच्या काळात विवाहापूर्वी कुंडली जुळवली जात होती, पण आता आयव्हीएफ हॉरोस्कोप अर्थात राशी जुळवून पाहण्याची वेळ आली आहे. जीवनशैली अन् विलक्षण ताणतणावांमुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. मात्र, परदेशी पॅटर्नच्या आधारावर केलेले कायदे यात मोठा अडथळा निर्माण करणार आहेत. त्यामुळे अलीकडील काळात आयव्हीएफबाबत सकारात्मक झालेले वातावरण आता पुन्हा मागील पावलावर येण्याची शक्यता शहरातील आयव्हीएफ तज्ज्ञांनी दिव्य मराठीच्या वतीने मंगळवारी आयोजित केलेल्या चर्चासत्रात व्यक्त केली. डॉ. मंजू जिल्ला, डॉ. पंडित पळसकर, डॉ. अपर्णा राऊळ, डॉ. राज बोलधने पाटील, डॉ. शिल्पा बोलधने पाटील, डॉ. प्रशांत इंगोले, डॉ. मनीषा इंगोले, डॉ. योगेश शिंदे, डॉ. अंजली शिंदे सहभागी झाल्या होत्या.
जाचक अटींमुळे संजीवनी ठरणार आता जीवघेणी
वंध्यत्वामुळे महिलांच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात प्रचंड तणाव निर्माण होतो. दांपत्याला मूल होत नाही याचा सर्वाधिक दबाव महिलेवर असतो. आयव्हीएफ त्यांच्या जीवनात आशेचा किरण होते. परंतु जाचक अटींमुळे ही संजीवनी आता जीवघेणी ठरणार आहे. कारण अनेक बंधने नव्या कायद्यामुळे आली आहेत. हे कायदे पाश्चात्त्य देशांच्या धर्तीवर केले. ते जसेच्या तसे इथे लागू करणे गैर आहे. -डॉ. मंजू जिल्ला
सरोगसीसाठी महिला मिळवणे मोठे आव्हान
आयव्हीएफ तंत्राने पालकत्व प्राप्त झालेल्या दांपत्यांचे आयुष्य बदलून जाते. आता ग्रामीणमध्येही याचा स्वीकार केला जातो. गर्भधारणेसाठी अडचण येणाऱ्या महिलांसाठी सरोगसीचा पर्याय होता. पण नव्या कायद्यात बदल झाले आहेत. त्यामुळे नात्यातील महिला सरोगसीसाठी मिळवणे मोठे आव्हान ठरणार आहे. तसेच, आयव्हीएफमुळे झालेले बाळ लपवले जाते.
-डॉ. पंडित पळसकर
आई-बाबा होणे हा सर्वात मोठा आनंद
नैसर्गिकदृष्ट्या आई-बाबा न होणाऱ्यांसाठी आयव्हीएफ तंत्र संजीवनी होते यात शंकाच नाही. आता सरोगसी- बरोबरच पती-पत्नीच्या वयावरही शासनाने मर्यादा घातल्या आहेत. म्हणजे पूर्वी विविध प्रयत्न करूनही बाळ न होणारे लोक आमच्याकडे येत. तसे आता करता येणार नाही. परंतु आई-बाबा होणे हा जगातील सर्वात मोठा आनंद आहे.
-डॉ. राज बोलधने
विवाहापूर्वीच पावले उचलायला हवी
विवाहाचे वय वाढल्याने वंध्यत्वाचा धोकाही वाढत आहे. मात्र, त्यावर उपाय आहे. ज्या मुलांना करिअरला प्राधान्य द्यायचे आहे त्यांना लवकर मूल नको आहे. त्यांनी तज्ज्ञांकडे जाऊन गर्भाशयाची तपासणी करून अंडी संवर्धन करावी. पुरुषांनीही शुक्राणू जतन करावेत. त्यामुळे भविष्यातील अडचणी कमी करता येतील. तरुणाईने आहार, व्यायामाकडे लक्ष द्यावे.
-डॉ. अपर्णा राऊळ
वाढदिवसाचा सोहळा आमच्यासाठी खास असतो
आजवर माझ्याकडे ज्या दांपत्यांनी उपचार घेतले ते मुलांच्या वाढदिवसांना बोलावतात. तेथे जाणे हा आमच्यासाठी खूप भावनिक समाधानाचा विषय आहे. या मुलांसाठी आम्ही कार्यक्रम घेतला होता. तेव्हा प्रत्येकाला भेटताना वेगळाच अनुभव आला. कारण या मुलांना बनवताना सर्वात आधी आम्ही पाहिलेले असते. पण मुलगा की मुलगी हे आमच्या हाती नसते.
-डॉ. योगेश शिंदे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.