आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजपूत समाजासाठी ‘भामटा’ हा शब्द यापुढे वापरला जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली. तर महाराणा प्रताप यांच्या समर्पणाची आठवण ठेवून यापुढे मुघल काळ न म्हणता महाराणा काळ म्हणायला हवे, असे मत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केले.
रविवारी (१४ मे) छत्रपती संभाजीनगरातील अयोध्यानगरी मैदानावर वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे आदींची उपस्थिती होती.
संमेलनाचे प्रास्ताविक करताना जयकुमार रावल यांनी राजपूत समाजाच्या पुढे भामटा हा शब्द लागणे दुर्दैवी आहे, असे सांगितले. देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण पत्करणारे सर्वाधिक राजपूत असताना त्यांना हे सहन करावे लागते हे चुकीचे आहे, असे रावल यांनी सांगितले. यावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अशा प्रकारे राजपूत समाजासाठी भामटा हा शब्द वापरणे हीच भामटेगिरी आहे. यापुढे हा शब्द वापरला जाणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी विनंती केली. यावर एकनाथ शिंदे यांनीदेखील याला दुजोरा देत तत्काळ याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. त्याचबरोबर राजपूत समाजासाठी स्वतंत्र महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल. या सगळ्या मागण्यांसाठी पुढील १५ दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
महाराणा प्रताप यांच्या शौर्याची हजार वर्षे प्रेरणा मिळेल....
भारताचा इतिहास हा स्वाभिमानाचा इतिहास आहे. इंग्रजांच्या विरोधात लढणाऱ्या क्रांतिकारकांनादेखील महाराणा प्रतापांच्या कार्याची प्रेरणा होती. त्यांना वाटले असते तर मुघलांचे मांडलिकत्व पत्करून ते विलासी आयुष्य भोगू शकले असते. मात्र त्यांनी गवताची भाकरी खाल्ली, जंगलात राहिले, पाचशे वर्षे झाली तरी त्यांच्या इतिहासातून प्रेरणा मिळते आणि पुढील १००० वर्षे मिळत राहील. मुघल सम्राट अकबराच्या विरोधात त्यांनी संपूर्ण जीवनसंघर्ष केला. त्यांना माहिती होते. ते झुकले असते तर या हिंदुस्थानातील धर्मपताका झुकली असती. महाराणा प्रतापांच्या समर्पणाला आपण योग्य समजत असाल तर त्या काळाला मुघल काळ न म्हणता महाराणा काळ म्हणायला हवे, असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.