आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीतील राजकारण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पाडण्यासाठी विडा उचलणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आता खैरेंना जाहीर पाठिंबा देऊन, ‘मी विधानसभेच्या तयारीला लागलोय,’ अशी भूमिका एका व्हिडिओद्वारे जाहीर केली आहे. त्यामुळे राजकारणात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून बाहेर पडून जाधव यांनी बंडखोरी केली होती. या दोघांच्या वादात एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले. त्याचा आता जाधव यांना पश्चात्ताप झाला असून त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले की, मी २०१९च्या विधानसभेला व लोकसभेला चुकलो. यामुळे माझ्या जवळचे लोक मला सोडून गेले. गृहकलह खूप वाढला होता. पण, आता मी चूक करणार नाही. मी माझे घरगुती, वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून तालुक्याच्या जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी तटस्थ राहीन. स्व. रायभान जाधव यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय मी आज घेतला व विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलोय. लोकसभा निवडणुकीत खैरे हेच विजय होतील, कारण मी त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे.
पाठिंब्याबद्दल अनभिज्ञ
त्यांनी मला फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा दिला, याबाबत मी अनभिज्ञ आहे. प्रथम ते काय बोलले त्याची माहिती घेतो. त्यानंतर माझी भूमिका जाहीर करणार आहे.
- चंद्रकांत खैरे, माजी खासदार
जनताच ठरवेल
माजी आमदार जाधव यांनी माजी खासदार खैरे यांना पाठिंबा दिला, तरी मतदार कुणाला संसदेत पाठवायचे हे ठरवतील. युवकांनी राजकारणात यावे व प्रस्थापितांना धक्का देत राहावे, मी पाच वर्षे काय काम केले हे जनता ठरवेल.
- इम्तियाज जलील, खासदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.