आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा कहर:मराठवाड्यातील बाधितांची संख्या 4431; बळींची संख्याही 209वर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाचा कहर जालना जिल्ह्यात नववा बळी, औरंगाबादेतही ४ मृत्यू
  • २६९७ रुग्णांनी केली कोरोनावर मात, १५२५ रुग्ण सक्रिय
Advertisement
Advertisement

मराठवाड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येसोबतच बळींचा आकडाही वाढतच आहे. बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यात चौघांचा तर जालना येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे मराठवाड्यातील कोरोना बळींची संख्या २०८ झाली आहे. दरम्यान, बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यात ९६ तर जालना ७, तर लातूर जिल्ह्यात ३ संशयितांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील एकूण बाधितांची संख्या ४४३१ वर गेली असून सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ११५२५ इतकी आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे एकूण ४४३१ रुग्णांपैकी २६९७ रुग्ण ठणठणीत होऊन घरी गेले आहेत.

सध्या औरंगाबाद, जालना, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे. पैकी बुधवारी नांदेड जिल्ह्यात रुग्ण वाढीला ब्रेक लागला. मात्र औरंगाबाद आणि जालन्यात रुग्ण वाढीचा रतीब सुरूच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल १०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर चौघांचा मृत्यू झाला. तर जालना जिल्ह्यात नवे २३ रुग्ण निष्पन्न झाले असून एकाचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे जालना जिल्ह्यातील मृतांची संख्या आता ९ झाली आहे.

जालना जिल्ह्यात कोरोनाचा नववा बळी : जालना तालुक्यातील जामवाडी येथील ६० वर्षीय वृद्धेचा मंगळवारी मृत्यू झाला असून जिल्ह्यातील हा कोरोनाचा नववा बळी ठरला आहे. त्यामुळे जालना शहरात कोरोनाची भीती वाढली आहे. मृत झालेला रुग्ण चार ते पाच दिवसांपासून आजारी होता. त्याने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र, तब्येत अधिकच गंभीर झाल्यामुळे त्याला मंगळवारी जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी संबंधित जिल्हा रुग्णालयात रेफर केले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासले असता, तो मृत होता. खबरदारी म्हणून ताबडतोब त्याचे स्वॅब नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले. त्याचा अहवाल बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. के. राठोड यांनी दिली.

भोकरदनच्या रुग्णाचा औरंगाबादेत मृत्यू
भोकरदन शहरात आढळलेल्या ६० वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मंगळवारी मध्यरात्री औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. सदर रुग्णाचा अहवाल १३ जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, मृतदेहावर औरंगाबादेतच दफनविधी करण्यात आल्याची माहिती भोकरदन पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली. तर मृताच्या संपर्कातील तिघांना भोकरदन येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे.

कतार देशातून औंढा नागनाथ येथे आलेला तरुण पॉझिटिव्ह
हिंगोली जिल्ह्यात बुधवारी चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कतार या देशातून औंढा नागनाथ येथे दाखल झालेला २६ वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच राखीव दलाचे दोन जवान व कळमनुरी तालुक्यातील टव्हा या गावात दिल्ली येथून आलेला तरुण पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय इतर तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता हिंगोली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३३ झाली आहे. त्यापैकी २०० रुग्ण बरे झाले आहेत तर ३३ जणांवर उपचार सुरु आहेत
नांदेडमध्ये पोलिस दलात कोरोनाचा प्रवेश

शहरात वेगाने पसरत चाललेल्या कोरोनाने आता पोलिस खात्यात प्रवेश केला. वजिराबाद पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याच्या अहवाल मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आला. काही दिवसांपूर्वी बरकतपुरा येथील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. हा पोलिस कर्मचारी त्या महिलेचा मुलगा आहे. आईच्या संपर्कातूनच त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. या पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

लातूरमध्ये तीन नवे रुग्ण, बाधितांची संख्या २११
लातूर जिल्ह्यात बुधवारी तीन नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यातील एक रुग्ण शहरातील भोई गल्लीतील असून उर्वरीत दोन रुग्ण ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली . दरम्यान, लातूर येथील दोन रुग्णांना बुधवारी घरी सोडण्यात आले. यातील ६८ वर्षीय महिला रुग्णाला उच्च रक्तदाब व दमा हा आजार होता तसेच त्यांना न्यूमोनिया झाला होता.

Advertisement
0