आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पावसामुळे नुकसान:अतिवृष्टीने नर्सरीची धूळधाण, लाखाे रुपयांचे नुकसान; तरी जिद्द कायम

बाजीराव रोकडे | औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दाद मागावी तरी कुणाकडे, हा प्रश्न आमच्यासमोर उभा : श्रीकिसन निकस, महारुद्र हायटेक नर्सरी

अवघ्या ३२ मिनिटांत ७१ मिमी तुफानी पावसाची नोंद करणारी २३ जुलैची रात्र औरंगाबादकरांसाठी कायम स्मरणात राहणारी ठरली. तशीच ती सावत्रा (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील मूळ व सध्या औरंगाबादेत वास्तव्यास असलेल्या श्रीकिसन व विजय निकस या भावंडांसाठीही काळरात्र ठरली. तीन वर्षांपूर्वी या दाेघांनी औरंगाबादेतील रेणुका माता मंदिर मार्ग, बीड बायपास येथे ३० गुंठे जमीन भाड्याने घेऊन विविध भाजीपाला पिकांची नर्सरी तयार केली. २३ जुलैच्या अतिवृष्टीने नर्सरीमध्ये गुडघाभर पाणी साचले. रोपटी लावलेले ट्रेसह पाण्यासोबत ३०० फुटांपर्यंत वाहून गेले. सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले. भरपाईसाठी त्यांनी मंडळ अधिकाऱ्यांना फोन केला. मात्र, त्यांनी महसूलकडे बोट दाखवले. तेथेही काही मदत झाली नाही. अखेर त्यांनी संकटाचा धैर्याने सामना करण्याचे ठरवले. मराठवाड्यासह विदर्भ व खान्देशातून आलेल्या शेतकऱ्यांच्या विविध भाजीपाला रोपांची ऑर्डर त्यांना घरपोच देण्याचे ठरवले. पुन्हा नव्या जोमाने रोपांची लागवड सुरू करत अन्य व्यावसायिकांसाठी आदर्श निर्माण केला.

श्रीकिसन निकस यांनी जळगाव जामोद येथे कृषी पदविकेचे शिक्षण घेऊन पुण्यातील नर्सरीत काही वर्षे नोकरी केली. त्यांचा भाऊ विजय औरंगाबादेतील एका कंपनीत काम करत होता. त्यामुळे श्रीकिसन यांनी २०१६ मध्ये औरंगाबादमध्ये सातारा परिसरातील एमएसईबी कार्यालयाजवळ एक एकर जमीन एका वर्षासाठी भाड्याने घेऊन महारुद्र हायटेक नर्सरीची स्थापना केली. सात ते आठ मजुरांना बारमाही रोजगार मिळाला. दरम्यान, अल्पदरात, घरपोच दर्जेदार रोपे मिळत असल्याने मराठवाड्यासह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांचाही महारुद्रवर विश्वास वाढला. एक वर्षाचा करार संपल्यावर निकस बंधूंनी रेणुकामाता मंदिर मार्गावर ३० गुंठे जमीन भाडेतत्त्वावर घेऊन तेथे नर्सरी सुरू केली. तेव्हा विजयही नोकरी सोडून भावासोबत आले. यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा तसेच खान्देशातील शेतकऱ्यांकडून मिरची, टोमॅटो, शेवगा, पपई, वांगे यासह झेंडू व अन्य फुलांची लाखो रुपयांची मागणी होऊ लागली. मात्र, २३ जुलैच्या अतिवृष्टीने नर्सरीची धूळधाण केली. आता ऑर्डरचा पुरवठा करायचा याची चिंता भेडसावत असताना या भावंडांना आई-वडिलांनी धीर दिला व पुन्हा एकदा नर्सरीत रोपे लावणे सुरू केले.

दाद मागावी तरी कुणाकडे

अतिवृष्टीने नर्सरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाकडे भरपाईची तरतूद नसल्याचे अधिकारी सांगतात. त्यामुळे कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. - श्रीकिसन निकस, संचालक, महारुद्र हायटेक नर्सरी, औरंगाबाद.