आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचएसजे क्रिकेट स्टेडियमवर वनडे मॅच:मास्टर क्लब विजयी, जाधव इलेव्हन संघाला हरवले; संग्राम परिहार, अर्थवची अष्टपैलू कामगिरी

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाल येथील एचएसजे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या वनडे क्रिकेट स्पर्धेत मास्टर क्लबने विजय मिळवला. सामन्यात मास्टरने जाधव इलेव्हन संघावर 5 गड्यांनी मात केली. या लढतीत तेजस घायवट सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करताना जाधव संघ 34 षटकांत 9 बाद अवघ्या 146 धावा करु शकला. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर घोरसडे केवळ 1 धावांवर बाद झाला. प्रफुल्ल नेमानेने त्याचा त्रिफळा उडवला. दुसरा सलामीवीर क्षितिज चव्हाण भोपळाही फोडू शकला नाही. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विवेक घुलेने एकाकी लढत देत अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने 66 चेंडूचा सामना करताना 8 सणसणीत चौकार व 3 षटकार खेचत 70 धावा ठोकल्या. तेजस घायवटने विवेक बोर्डेच्या हाती त्याला झेल बाद करत अडथळा दुर केला. राज भोसले 4 धावांवर परतला. त्यानंतर आलेल्या महेश राठोडने संयमी खेळी केली. त्याने 61चेंडूंत 3 चौकार व 1षटकार लगावत 40 धावा जोडल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. आदित्य वाघ एका धावेवर परतला. कुणाल केलानी व ध्रुव पुंड यांना अर्थव बोडखेने सलग दोन चेंडूवर त्रिफळाचित करत शुन्यावर बाद केले. जाधव संघाला तब्बल 28 धावा अतिरिक्त मिळाल्या.

मास्टरकडून तेजस घायवटने 4 षटकांत 25 धावा देत 3 फलंदाज तंबूत पाठवले. त्याने एक षटक निर्धाव टाकले. अर्थव बोडखेने 2 आणि प्रफुल्ल नेमाडे व संग्राम परिहार यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

संग्राम परिहार, अर्थव बोडखेची अष्टपैलू कामगिरी :

प्रत्युत्तरात मास्टर क्रिकेट क्लबने 29.1 षटकांत 5 गडी गमावत 148 धावा करत विजय साकारला. गोलंदाजीत चमकदार कामगिरी केल्यानंतर सातव्या क्रमांकावर आलेल्या अष्टपैलू संग्राम परिहारने नाबाद सर्वाधिक 36 धावांची विजयी खेळी केली. या खेळीत त्याने 21 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचले. पाचव्या क्रमांकावर आलेल्या अष्टपैलू अर्थव बोडखेने 53 चेंडूंत 5 चौकारांसह नाबाद 25 धावा काढल्या. संघाचे आघाडीचे तिन्ही फलंदाज अपयशी ठरले. यश जैस्वाल (8), शोएब फारुकी (8) व अब्दुल रकिब (9) स्वस्तात बाद झाले. अर्शद खानने संघाची आणखी पडझड होऊ दिली नाही. त्याने 50 चेंडूंत 4 चौकाराच्या मदतीने 27 धावांचे योगदान दिले.

जाधवकडून राज भोसलेने 2 आणि महेश राठोड, ध्रुव पुंड व आदित्य वाघ यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

बातम्या आणखी आहेत...