आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईत दुजाभाव:गर्भपात औषध विक्रीप्रकरणी गुन्हे; एजन्सीचे पत्ते सापडेनात, मॅनकाइंड फार्मा कंपनीवर फक्त ठपका

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भपाताच्या किटची ऑनलाइन बेकायदा विक्री केल्याच्या प्रकरणात मिशो ऑनलाइन पोर्टल व एजन्सीचालक अजयकुमार सिंग यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला. अन्न व औषधी प्रशासनाने यासंदर्भात दोन वेळा उत्तर प्रदेशमध्ये कंपनीशी पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपन्यांचे पत्ते अपूर्ण असल्याने उत्तर मिळू शकले नाही. विशेष म्हणजे अहवालात गर्भपात किट असलेल्या मॅनकाइंड फार्मा या बड्या औषधी कंपनीवर फक्त या सगळ्या रॅकेटवर अंकुश नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मिशो ऑनलाइन पाेर्टलवर गर्भपाताच्या औषधांची बेकायदा विक्री केली जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावरून महिनाभरापूर्वी औषधी व्यावसायिक निखिल मित्तल यांनी विविध वस्तू, कपड्यांच्या विक्रीच्या नावाखाली असलेल्या अॅपवरून गर्भपाताच्या किट मागवले होते. ४ एप्रिल रोजी त्यांना अवघ्या २९६ रुपयांमध्ये हे किट प्राप्त झाले. सरकारकडून यासंदर्भात कडक नियम व निर्बंध असतानाही मात्र देशभरात अशा अनेक वेबसाइट सर्रास डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय हे किट विकतात.

मित्तल यांनी याप्रकरणी पुराव्यासह औषधी व अन्न विभागाकडे तक्रार केली. मात्र, त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सिटी चौक पोलिस ठाण्यात औषध निरीक्षक जीवन जाधव यांनी फिर्याद देत दोघांवर गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

राज्यभरात १३ गुन्हे दाखल
या प्रकरणात बृहन्मुंबईत सहा, ठाणे येथे ३, कोल्हापूर, औरंगाबाद, जळगाव व नागपूर येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे. मिशो संकेतस्थळावर कुठेही गर्भपाताच्या किटचा उल्लेख नाही. ती सर्च बॉक्समध्ये शोधल्यास विविध प्रकारच्या किट मिळून येतात. सर्वत्र सर्रास हा प्रकार सुरू असल्याचे समोर आल्यानंतर अन्न व औषधी विभागाकडून कारवाई सुरू
करण्यात आली. मात्र, पत्तेच अपूर्ण असल्याने पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ऑर्डरची पूर्तता व्यवस्थित, पत्ता मात्र अपूर्ण
औषधी विभागाने मिशो कंपनीला परवान्याची प्रत व इतर कागदपत्रे मागण्यासाठी पत्रव्यवहार केला. मात्र, २२ एप्रिल रोजी अपूर्ण पत्ता आशयासह नोटीस परत आली. खरेदी बिलावरून किटची विक्री वाराणसीच्या अजयकुमार सिंग याच्या एजन्सीकडून विक्री झाल्याचे समोर आले. तेथील स्थानिक औषध नियंत्रकांना पत्राद्वारे संपूर्ण पत्ता पाठवून विचारण केली. मात्र, तेथेही अपूर्ण पत्ता असा अभिप्राय मिळाला. मात्र, तेथून राज्यभरात सर्रास किटची विक्री होत होती, हे विशेष.

बातम्या आणखी आहेत...