आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवाहरनगर आणि बेगमपुरा ठाण्याची कारवाई:सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; दोघांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांत शहरात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, पोलिसांची बारकाईने सोशल मीडिया पेट्रोलिंग सुरू आहे. वादग्रस्त, आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, कठोर कारवाईला सामाेरे जावे लागेल, असा इशारा पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिला आहे. दरम्यान, जवाहरनगर व बेगमपुरा पोलिस ठाण्यात अशी पोस्ट करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सईद अयाज अहेमद व सोनू पोळ अशी आरोपींची नावे आहेत.

२४ फेब्रुवारी रोजी शहराच्या नामांतरानंतर समर्थन आणि विरोधातही मत व्यक्त हाेणे सुरू झाले. माेर्चे, आंदोलनाचे प्रमाण वाढले. ३० मार्च रोजी जिन्सी भागात तणाव निर्माण झाला. त्यानंतर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट सुरू झाल्या. मार्च महिन्यातही अशा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. युवासेनेचे जिल्हाप्रमुख शेखर जाधव यांना हा प्रकार आढळून आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला, तर बेगमपुरा पोलिस ठाण्यात सायबर पोलिस ठाण्याचे गोकुळ कुतरवाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.

लाइक, कमेंटही करू नका आयुक्तांच्या सूचनेवरून सायबर पोलिस ठाण्यात २४ तास २५ कर्मचारी सोशल मीडिया पेट्रोलिंग करत आहेत. विशिष्ट टूलद्वारे आम्ही आक्षेपार्ह पोस्टचा शोध घेत आहोत. गुन्हा दाखल झाल्यानंतर तुरुंगात जाण्याची वेळ येईल. शिवाय त्यामुळे आहे ती नोकरी, कामही गमावण्याची वेळ येईल. त्यामुळे तरुणांनी चुकीची पोस्ट करू नये शिवाय तशा पोस्टवर लाइक, कमेंटही करू नका, असे आवाहन निरीक्षक प्रविणा यादव यांनी केले आहे.