आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालेकिल्ल्याला हादरा:शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांची कार्यालये ओस

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उदयसिंह राजपूत म्हणाले, मी शिवसेनेसोबतच; खैरेंचा दावा : जैस्वाल कडवट, ते परत येतील

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे काही मंत्री, आमदारांसोबत सुरतला गेले. त्यात शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार आहेत, अशी बातमी मंगळवारी सकाळी साडेसात वाजता वृत्तवाहिन्यांवर झळकली. आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. ती रात्री उशिरापर्यंत कायम होती. पण कोणीही संताप, राग व्यक्त केला नाही. एरवी आमदार, मंत्री दौऱ्यावर किंवा बाहेरगावी असतानाही त्यांच्या कार्यालयावर गर्दी असते. दिव्य मराठी प्रतिनिधीने पाहणी केली तेव्हा कार्यालये ओस पडली होती. घरांसमोर शुकशुकाट होता. दरम्यान, शिंदेंसोबत गेल्याची चर्चा असलेले उदयसिंह राजपूत यांनी मी शिवसेनेसोबतच असल्याचे सांगितले. माजी खासदार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, प्रदीप जैस्वाल माझ्यासारखेच कडवट शिवसैनिक आहेत. ते नक्की परत येतील.

खैरे यांच्या मछली खडक येथील कार्यालयात शिवसेनेचे विभागीय सचिव अशोक पटवर्धन एकटेच वर्तमानपत्र वाचत बसलेले होते. ताज्या घडामोडींविषयी काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. शिवसैनिकांचा सर्वाधिक राबता असलेल्या प्रदीप जैस्वाल यांच्या नारळीबाग येथील कार्यालयात दुपारी साडेबाराच्या सुमारास एक-दोन कार्यकर्ते बसलेले होते. दोन पोलिस कर्मचारी आले आणि निघून गेले. या कार्यालयात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचीही मोठी ऊठबस असते. पण मंगळवारी त्यापैकीही कोणी नव्हते. म्हणून दिव्य मराठी प्रतिनिधीने निराला बाजार येथील जैस्वाल यांचे निवासस्थान गाठले. तेव्हा त्यांचे चिरंजीव, युवा सेना पदाधिकारी ऋषिकेश जैस्वाल घरीच होते. ते म्हणाले की, मी रात्रीच सिंगापूरवरून मुंबईला आणि मुंबईतून सकाळी औरंगाबादला आलो. माझा कालपासून प्रदीप जैस्वाल यांच्याशी संपर्क झालेला नाही. बातम्या पाहून मी त्यांना सतत कॉल करत आहे. पण त्यांचा मोबाइल स्वीच ऑफ आहे.

आमदार जैस्वाल शिवसेना सोडून जाणार असे म्हटले जात आहे, असे सांगितल्यावर ऋषिकेश पटकन म्हणाले की, मी एकाच वाक्यात सांगतो.मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. बाकी मला काही माहिती नाही. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या रोजाबाग येथील निवासस्थानी शुकशुकाट होतो. त्यांचे चिरंजीव समीर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. मी वर्षावर आहे, नॉट रिचेबल नाही : शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्याशी दिव्य मराठीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, शिवसेनेला आणि सरकारला कोणताही धोका नाही. कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत माझ्यासोबतच आहेत. राजपूत यांनी सांगितले की, मी मोबाइल बंद करून ठेवला होता. मी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षावरच असून शिवसेनेसोबत आहे. त्यांनी त्यांचा आमदार दानवेंेसोबतचा फोटोही दिव्य मराठी प्रतिनिधीला मोबाइलवर पाठवला अाहे.

मंत्र्यांच्या कार्यालयातही लोकांची वर्दळ नाही विभागीय क्रीडा संकुल परिसरात संदिपान भुमरे यांच्या कार्यालयात पैठण, ग्रामीण भागातील लोकांची वर्दळ असते. मंगळवारी हे चित्र पाहायला मिळालेले नाही. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांच्याही कार्यालयात चिटपाखरू नव्हते.

आदित्य ठाकरेंचे आदेश ऐकावे लागत असतील तर नाराजीचा स्फोट होणारच एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेल्यांना उद्धव ठाकरेंचे आदेश ऐकावे लागणे इतपत ठीक आहे. पण एकनाथ शिंदेंसारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना आदित्य ठाकरेंचेही आदेश ऐकावे लागत असतील. त्यांच्या पुढेपुढे करावे लागत असेल तर नाराजीचा स्फोट होणारच. मराठवाडा आणि विदर्भात दीर्घकाळ काम केलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणाले की, संदिपान भुमरेंची नाराजी म्हणजे आश्चर्यच आहे. आता काय त्यांना मुख्यमंत्री पद द्यायचे होते का?

आमची राम - लक्ष्मणाची जोडी : खैरै शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे सायंकाळी सहा वाजता मुंबईकडे निघाले होते. तत्पूर्वी दिव्य मराठी प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादसह इतर भागातील आमदार सध्या संपर्कात नसले तरी ते पुन्हा परत येतील. विशेषत: प्रदीप जैस्वाल माझ्याप्रमाणेच कडवट शिवसैनिक आहे. आमची राम-लक्ष्मणाची जोडी आहे. त्यामुळे ते शिवसेना सोडणार नाहीत. भुमरेंना मंत्रिपद दिल्याने तेही माघारी फिरतील.

त्यांची कामेच झाली नाही : सावे भाजपचे आमदार अतुल सावे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत राज्यभरात कुठलीच ठोस कामे झालेली नाहीत. उद्धव ठाकरेंनी स्वत: लक्ष घालून कुठलाही निधी दिला नाही. निधी तर सोडाच, अडचणी समजून घेण्यासाठी वेळही दिला नाही. त्यामुळे आमदार नाराज होते आणि ते एकनाथ शिंदेंसोबत गेले. फडणवीस यांनी राज्यसभा, विधान परिषदेत जो चमत्कार घडवला तोच सरकारबद्दलही पाहण्यास मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...