आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:पालकमंत्र्यांच्या प्रतिक्षेत अधिकारी ताटकळले, चार वाजता होणारी बैठक रात्री सातवाजे पर्यंतही सुरु झालीच नाही

हिंगोली5 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली येथे कोवीड आढावा, पिककर्ज वाटप व इतर प्रश्‍नांवर पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १६) दुपारी चार वाजता आयोजित केलेली बैठक पालकमंत्री प्रा. गायकवाड रात्री सात वाजेपर्यंत आल्याच नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी चार तासा पेक्षा अधिक काळापर्यंत ताटकळत बसले होते.

हिंगोलीच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत प्रसिध्दीपत्रक काढून त्यात दौऱ्याचे नियोजन नमुद केले होते. त्यानुसार पालकमंत्री प्रा. गायकवाड दुपारी अडीच वाजता परभणी येथून निघून चार वाजता हिंगोली येथे पोहोचणार होत्या. त्यानंतर सव्वा चार वाजता कोवीड आढावा बैठक, सायंकाळी सव्वा पाच वाजता पिककर्ज वाटप आढावा बैठक होणार असल्याचे नमुद केले आहे.

त्यानुसार या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांसह महसुल विभागाचे अधिकारी दुपारी तीन वाजल्या पासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात थांबले होते. मात्र सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत पालकमंत्री प्रा. गायकवाड हिंगोलीत आल्याच नाही. त्यामुळे मागील तीन ते चार तासा पासून अधिकारी व कर्मचारी ताटकळत बसले होते. उपाशी पोटी थांबलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून तिव्र नाराजीचा सुर उमटू लागला होता. दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजता पोलिस विभागाशी संपर्क साधला असता पालकमंत्री प्रा. गायकवाड औंढा नागनाथ पर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे.

0