आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​बिनीच्या शिलेदारांची 40 वर्षांनंतर आठवण:औरंगाबाद खंडपीठ स्थापनेतील अंतुले, व्यंकटराव देशपांडे, निलंगेकर यांची लागणार तैलचित्रे

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्मितीमध्ये महत्वपूर्ण भुमिका वठविणारांची 41 व्या वर्धापन दिनी खंडपीठ वकील संघाला आठवण झाली. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अब्दूल रहेमान अंतुले, मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालिन मुख्य न्यायमूर्ती व्यंकटराव देशपांडे आणि तत्कालिन कायदा मंत्री शिवाजी पा. निलंगेकर यांचे तैलचित्र खंडपीठाच्या 14 क्रमांकाच्या वकिलांच्या कक्षात लावण्यात येणार आहे.

शनिवारी (ता. 27 ऑगस्ट) खंडपीठाच्या 41 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमापूर्वी तैलचित्रांचे अनावरण केले जाणार असल्याची माहिती खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अ‌ॅड. नितीन चौधरी व सचिव अ‌ॅड. सुहास उरगुंडे यांनी दिली.

औरंगाबाद खंडपीठ निर्मितीमध्ये तिघांचे मोलाचे योगदान राहिले. औरंगाबाद खंडपीठात 12 जिल्ह्यांचा समावेश असून चाळीस वर्षांनंतर निर्मितीमध्ये योगदान राहिलेल्या तिघांचे तैलचित्र लावण्याची आठवण खंडपीठ वकील संघाला झाली. औरंगाबाद खंडपीठ स्थापनेची कार्यवाही तेव्हाचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व्यंकटराव देशपांडे यांनी पार पाडली होती. त्यांच्याच निर्णयास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी निर्मितीसाठी परिश्रम घेतले होते. त्यांना तेव्हाचे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले आणि कायदामंत्री लातूरचे शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी पाठबळ दिल्यामुळे खंडपीठाची औरंगाबादेत स्थापना होऊ शकली.

औरंगाबाद खंडपीठात वकिली व्यवसाय करणाऱ्या अनेकांना न्यायदान करण्याची संधी मिळाली. खंडपीठ वकील संघातून न्यायमूर्ती झालेल्या न्या. नरेश पाटील व न्या. संभाजी शिंदे मुख्य न्यायमूर्ती म्हणून अनुक्रमे मुंबई उच्च न्यायालय व राजस्थान उच्च न्यायालयात न्यायदान करण्याची संधी मिळाली. औरंगाबाद खंडपीठाच्या ग्रंथालयात दोघांचे तैलचित्र लावण्यात आले. परंतु ज्यांच्यामुळे खंडपीठ निर्माण झाले त्यांच्या तैलचित्रासाठी चाळीस वर्षे वाट पाहावी लागली. खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अ‌ॅड. नितीन चौधरी आणि सचिव सुहास उरगुंडे यांच्या पुढाकारातून आता त्यांचेही तैलचित्र वकीलांच्या कक्षात लावण्यात येणार आहे.

तैलचित्राचे लोकार्पण मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. दीपांकर दत्ता, न्या. प्रसन्न वराळे, न्या. संजय गंगापूरवाला व खंडपीठाचे मुख्य प्रशासकीय न्या. रवींद्र घुगे यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. सकाळी 11 वाजता खंडपीठाच्या मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...