आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ज्या वृद्धाश्रम आणि धर्मशाळेत गेलो तिथे आमच्या पदरी निराशाच आली. कुठे वागणूक नीट देत नव्हते तर कुठे जेवण, एका ठिकाणी तर पैसे घेवूनही हाकलून लावले. आता या वयात हे दु:ख अपमान सहन होत नाही. आम्हाला काहीही नको पण डोक झाकायला निवारा आणि सन्मानाची वागणूक मिळेत अशा ठिकाणी रहायला थांबवण्याची व्यवस्था करुन द्या. अशी विनंती पानावलेल्या डोळ्यांनी बाबुराव पटवर्धन आणि त्यांची पत्नी प्रभा पटवर्धन या दाम्पत्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे केली. आम्ही तुम्हाला भेटायला आलो जिल्हाधिकाऱ्यांनाही आम्ही निवेदन दिले आहे. काहीतरी करा अशी विनंती या दाम्प्यांनी केली.
बाबुराव पटवर्धन यांनी सांगितले की, आम्हाला हैद्राबाद येथे कोरोनाच्या काळात वृद्धाश्रमातून बाहेर काढले. आश्रमातून बाहेर काढल्यानंतर निझामाबाद, बासर, आदीलाबाद येथील मंदिरात भीक मागून पोटाची भूक भागवत पाण्या पावासात एकमेकांचा हात पकडत औरंगाबादचा रस्ता पायीच पकडला. आमची परिस्थिती पाहून एका सामाजिक कार्यकर्त्याने औरंगाबादला आणून सोडले. पण इथेही सहकार्य नसल्यामुळे रोकडी हनुमान मंदिरात आयुष्याचा वनवास भोगत आहोत. आम्ही काही तुम्हाला उगाच सहानुभूमी हवी म्हणून आमची आपबीती सांगत नाही. हे आमच्या जीवनाच वास्तव असल्याचे ८८ वर्षाचे बाबुराव आजोबा आणि ८० वर्षाच्या प्रभा आजी एकमेकाचा हात पकडून जिल्हा परीषदेत सांगत होत्या. हातात एक गाठोड होतं. कावऱ्याबावऱ्या नजरेने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या चेहऱ्याकडे आशेने पाहात होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर तिथल्या एकाने आम्हाला जिल्हा परिषदेत पाठवल. प्रभा आजी म्हणाल्या, ‘‘पोरांनो... आम्हाला एखाद्या वृद्धाश्रमात राहाण्याची सोय करता का? पाण्यापावासात राहाण्याची खूप तारांबळ होत आहे. मुलाकडे का राहात नाही? असे विचारल्यावर आजी रडायलाच लागल्या, ‘‘तुमच्या सारखा मलाही एक मुलगा होता. खूप शिकवून त्याला मोठे केल होतं. एका उच्च पदावर नोकरीला होता. पती तलाठीपदावर कार्यरत होते. बीडबायपासला मोठं घर होतं. कोणाची दृष्ट लागेल असा आमचा संसार होता. १९९९ साली मुलाचं लग्न लावून दिले, काही दिवसांत सुनेमुळे घरात भांडणं होवू लागली. मुलांचे आमच्यावर खूप प्रेम होतं. तीचा त्रास सहन करत त्याने आमचा सांभाळ केला. पण एका अपघाताने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या पंधरा दिवसांत सुनेने आम्हाला घराबाहेर काढले. तेंव्हापासून आज २१ वर्ष होत आली आहे आम्ही वेगवेगळ्या वृद्धाश्रमात मरण यातना जगत आहोत, पत्नीने आपल्या दु:खाला बोलून मोकळे केल्यावर बाबुराव आजोबांना देखील अश्रुअनावर झाले होते.
द्वेश सहन करत जगणाऱ्या या दांपत्यांनी एखाद्या वृद्धाश्रमात व्यवस्था करुन द्यावी, नाहीतर इच्छा मरणासाठी परवानगी द्यावी अशी निवेदनात केली. आपण सहकार्य करु असे मिरकले यांनी सांगितले तर महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांनी देखील आपण हवी ती मदत करु असे आश्वासन दिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.