आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावत्र पित्याचा लेकीवर वारंवार अत्याचार:औरंगाबादेत वर्षभरापासून नराधमाचे घृणास्पद कृत्य, 4 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिठाची गिरणी चालवणाऱ्या सावत्र पित्याने 16 वर्षीय लेकीवर वारंवार अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार शिवाजीनगर परिसरात उघडकीस आला. धक्कादायक म्हणजे पीडितेने तब्बल वर्षभर हा प्रकार सहन केल्यानंतर आईसह पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी नराधम पित्‍याला अटक केली, अशी माहिती तपास अधिकारी मिरा चव्हाण यांनी दिली. नराधम पित्‍याला 4 ऑगस्‍टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.एस. खडसे यांनी दिले.

अत्याचारानंतर मारहाण

प्रकरणात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली. त्‍यानुसार, पीडितेचे कुटूंब हे मुळचे उत्तरप्रदेशातील लखनऊ येथील रहिवासी असून सध्या गारखेडा परिसरात राहतात. कुटुंबात आईवडील व चार लहान भावंडांचा समावेश आहे. पीडितेसोबत राहणारे पिता हे तिचे सावत्र पिता असून ते शिवाजीनगरात पिठाची चक्की चालवितात. घटनेदरम्यान, पीडिताही कुटूंबासह किरायाच्‍या घरात रहात होती. त्‍यानंतर त्‍यांनी स्‍वत:चे घर बांधले. पीडितेचे नराधम पीता पिठाची चक्की चालवून दुपारी जेवणासाठी घरी येत असत, त्यानंतर पीडितेच्या आईला चक्कीवर पाठवून देत असत. २०२१ मध्ये एका दुपारी नराधम पिता घरी आल्यानंतर त्यांनी पीडितेवर बळजबरी अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगू नको म्हणत तिला जबर मारहाणही केली. त्यानंतर नराधमाचे हे कृत्य नेहमीचेच झाले होते. तसेच घराबाहेर जाऊ नको म्हणून ते पीडितेला शिवीगाळही करत असत. वेळोवेळी होणारे अत्याचार सहन न झाल्याने फेब्रुवारी २०२२ मध्ये पीडितेने ही गोष्ट आईला सांगितली. त्यावर आईने पीडितेला धीर देत पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे आश्वासन दिले, परंतू आरोपी दोघींनाही घराबाहेर जाऊ देत नव्‍हता. एक दिवस पीडितेच्‍या आईने नराधमाला मुलीसोबत वाईट कृत्य का करता, असा जाब विचारला. त्यावर नराधमाने पीडितेसह तिच्‍या आईला बेदम मारहाण केली.

तक्रार करताच अटक

मे २०२२ मध्ये पीडितेचे कुटुंबीय त्यांच्या स्वतःच्या घरी राहण्यास गेल्यानंतरही नराधम पिता तिच्यावर अत्याचार करत होता असे फिर्यादीत म्हटले आहे. अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मिरा चव्हाण यांनी आरोपी नराधमाला पित्याला तत्काळ अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीला ४ ऑगस्‍टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रकरणात सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...