आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेनगाव तालुक्यातील साखरा येथे एका वृध्द महिलेचा खून करून मृतदेह गावापासून सुमारे तीन किलो मिटर अंतरावरील घाटात पुरून टाकल्याचा प्रकार शनिवारी ता. १० सकाळी आठ वाजता उघडकीस आला आहे. भारजाबाई मारोती इंगळे (८५) असे या महिलेचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील साखरा येथील भारजाबाई इंगळे ह्या एकट्याच घरी राहतात. त्यांची चार मुले गावातच इतर ठिकाणी राहतात. आज पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला अन त्यांना गावापासून सुमारे तीन किलो मिटर अंतरावर नेऊन त्यांच्या तोंडावर दगडाने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह गावापासून सुमारे तीन किलो मिटर अंतरावर साखरा ते साखरा तांडा येथील घाटातील खड्डयात टाकून पुरून टाकला.
मात्र पहाटे पाच वाजता त्या ठिकाणी आवाज होत असल्याने परिसरातील आखाड्यावर असलेल्या कुत्र्यांनी त्या दिशेने भुंकण्यास सुरवात केली. मात्र या भागातील सर्वच आखाड्यावरील कुत्रे भुंकत असल्याने काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता घाटामध्ये खड्डयात माती टाकलेली दिसून आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी हा प्रकार साखरा गावात सांगितला. गावकऱ्यांनी घटनेची माहिती सेनगाव पोलिसांना दिली. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटील, उपनिरीक्षक अभय माकणे, जमादार राहुल कोरडे, दिलीप नाईक यांच्या पथकाने भेट दिली.
पोलिसांनी घटनास्थळावर माती उकरून पाहिले असता त्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह भारजाबाई इंगळे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले असून त्यांच्या घरात काही ठसे मिळतात काय याचा शोध घेण्यासाठी ठसे तज्ञांनाही पाचारण केले आहे. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न
या घटनेनंतर पोलिसांनी साखरा गावात ज्या दुकानांबाहेर सीसीटीव्ही आहेत त्याचे फुटेज पाहण्यास सुरुवात केली आहे. मध्यरात्री पासून किती वाहने गावात आली तसेच कोणती वाहने गावाबाहेर गेली याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.