आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सक्ती:फास्टॅग अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी विविध टाेलनाक्यांवर गाेंधळ

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात टाेल कर्मचारी-वाहनचालकांमध्ये वाद, पाेलिसांचा कडक बंदाेबस्त

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगला पुन्हा मुदतवाढ देण्यास ठाम नकार दिला आहे. देशातील सर्वच महामार्गांवर वाहनचालकांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आला असून साेमवारी रात्रीपासून त्याची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली. राज्यातील विविध महामार्गांवर फास्टॅग बसवण्यासाठी वाहनचालकांची एकच गर्दी झाली हाेती. फास्टॅग न बसवल्याने अनेक वाहनचालकांना भुर्दंड सहन करावा लागला. अनेक ठिकाणी टाेलनाक्यावर वाहनचालक व टाेल कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाले. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक काेंडीही निर्माण झाली हाेती.

सातारा : दोन टोलनाक्यांवर वादाच्या खटक्यांचे प्रसंग
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील आनेवाडी टोलनाका व तासवडे टोल नाका येथे आज फास्टॅग बसवण्याची मुदत संपल्याने फास्टॅग बसवण्यासाठी वाहनचालकांनी एकच गर्दी केली होती. दोन्ही टोलनाक्यांवर वाहनचालक व टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात या मुद्द्यावरून वाद-विवाद होऊ नये म्हणून दोन्ही बाजूंना मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. अनेकांनी फास्टॅग न बसवल्याने त्यांना भुर्दंड सोसावा लागत होता. फास्टॅग बसवण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही फास्टॅग न बसणाऱ्या वाहनधारकांकडून दुप्पट टोलवसुली करण्याबाबत आनेवाडी व तासवडे टोलनाक्यावर टोलनाका व्यवस्थापन यंत्रणेने कडक अंमलबजावणी केली होती. त्यामुळे टोलनाक्यावर फास्टॅग बसवण्यासाठी वाहनधारकांनी गर्दी केली होती. स्थानिकांना टोलनाक्‍यावर स्वतंत्र लेन नसल्याने तासन्‌तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे येथे वादाचे खटके उडताना दिसत होते.

काेल्हापूर : कर्मचाऱ्यांना मारणाऱ्यांना चोप
किनी टोलनाक्यावर फास्टॅग नसणाऱ्या वाहनांना काल मध्यरात्रीपासून दुप्पट टोल आकारण्यास सुरुवात केल्यामुळे टोल कर्मचारी व वाहनधारक यांच्यात दिवसभर वादावादी होत होती. मंगळवारी दुपारी तर टोल कर्मचारी व पुण्याचे वाहनधारक यांच्यात मारामारीही झाली. यानंतर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, टोलच्या दोन्ही बाजूंना दिवसभर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

नागपूर : काहींनी फास्टॅग काढले, काही परत गेले
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगला आणखी मुदतवाढ देणार नाही हे स्पष्ट केल्यानंतर चार मोठ्या टोलनाक्यांवर २ ते ३ टक्के लोकांनी पेनल्टी दिली. काहींनी फास्टॅग काढले तर अनेक जण टोल नाक्यावर न येता परत फिरल्याची माहिती ओरिएंट टोल प्लाझाचे वरिष्ठ व्यवस्थापक संदेेश अग्रवाल यांनी दिली. खुमारी, कन्हान, पांजरी व बोरखेडी येथे हे टोल प्लाझा आहेत. मालवाहतूक करणाऱ्या ट्रकसह इतर ९९ टक्के वाहनांनी फास्टॅग काढलेला आहे. न काढणाऱ्यांमध्ये कारची संख्या मोठी असल्याचे अग्रवाल म्हणाले. खुमारी टोल प्लाझावर ६ ते ७ हजार वाहने जातात. तिथे १३० वाहनचालकांनी डबल टोल भरला. अनेक जण टोल क्राॅस न करता परत जात असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

पिंपळगाव बसवंत : वाहनांना टोलसाठी दुप्पट रक्कम
रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय व महामार्ग प्राधिकरण अंतर्गत फास्टॅग नसलेल्या वाहनांना सोमवारपासून दुप्पट टोल भरावा लागत असल्याने पिंपळगाव येथील पीएनजी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. या रांगामुळे वाहनधारक व टोल कर्मचाऱ्यांत वाद निर्माण झाले. केंद्र शासनाने फास्ट नसलेल्या वाहनधारकांना सोमवारपासून दुप्पट रक्कम आकारण्यास सुरवात केली. पिंपळगाव टोलनाक्यावर दोन्ही बाजूस १६ लेन आहे. फास्टॅगसाठी वाहनांची माेठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे बघायला मिळाले.

पुणे : फास्टॅग बंधनकारक माहीत नसल्याचे सांगत वाद
सरकारने महामार्गवार वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना टोल नाक्यावर फास्टॅग मंगळवार पासून बंधनकारक केला आहे. मात्र, याबाबत पुरेशी कल्पना नसल्याचे सांगत तसेच फास्टॅग लावण्यास टाळाटाळ केल्याने दुप्पट टोल वसुली केली जात असल्याने वाहन चालक आणि टोल कर्मचारी यांच्यात वादविवाद होत असल्याचे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्स टोलनाका आणि पुणे- सातारा रस्त्यावर खेड शिवापूर टोलनाका येथे चित्र पाहवयास मिळाले. द्रुतगती महामार्गवार फास्टॅग प्रमाणे टोलवसुलीसाठी तयारी केली होती.

सांगली : रुग्णवाहिका २ तास खोळंबल्या
सांगली | फास्टॅग सक्तीच्या पहिल्याच दिवशी कराड जवळील तासवडे टोल नाक्यावर प्रचंड गोंधळ उडाला होता वाहनांना तब्बल ३ ते ४ तास खोळंबून रहावे लागले. रुग्णवाहिकाही २ तासाहून अधिक काळ थांबून होत्या. पुणे - बेंगळूरू महामार्गावरील तासवडे टोल नाक्यावर ९५ रूपये टोल आकाराला जातो परंतु फास्टॅगची सक्ती सुरु असतानाच या नाक्यावर स्कॅनर यंत्रणा बंद पडली. फास्टॅगधारकांच्याकडून ही रोखीने रक्कम वसुली सुरु केल्याने अन्य वाहनांनी दुप्पट कर देण्यासाठी नकार दर्शविला. सांगली ते पुणे या प्रवासाला एरवी चार ते साडेचार तासात होणाऱ्या या प्रवासाला मंगळवारी ९ ते १० तास लागत होते.

अशी झाली फास्टॅग विक्री
- आता सर्वच मार्गिकांवर १०० टक्के टाेल शुल्क आकारणीची अंमलबजावणी सुरू.
- खेड शिवापूर महामार्गावर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ५८८ वाहनांची फास्टॅग खरेदी केली.
- २०,००० वाहनांनी फास्टॅक प्रणालीचा अवलंब केला
- ३८०० वाहनांनी दुप्पट टाेल रक्कम भरली.

बातम्या आणखी आहेत...