आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी जोरात:औरंगाबादमध्ये उद्यानांसह मैदानांवर जाऊन निमंत्रण पत्रिकेचे वाटप; ठाकरे काय बोलणार?

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये ८ जून रोजी सभा होणार आहे. त्यासाठी आठवडाभरापासून ठिकठिकाणी बैठकांसह आता थेट जनसामान्यांशी संवादाच्या माध्यमातून सभेचे निमंत्रण देण्यात येतेय. शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे उद्यान, बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन, एमजीएम मैदानावर जाऊन मॉर्निंग वॉक, योग साधना, खेळण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. विशेष म्हणजे यावेळी योग साधनेला आलेल्या महिला, नागरिकांना सभेचे निमंत्रण दिले.

मुख्यमंत्र्याची पहिलीच सभा

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर शहरात उद्धव ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा होत आहे. बाळासाहेबांचे प्रेम असलेल्या या शहराचा कायापालट करण्यासाठी विकासकामे प्रगतीपथावर आहेत. सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणकोणत्या विषयांवर आपले प्रखर मत मांडतात याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. यामध्ये केवळ शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी शिवसेनेच्या वतीने नियोजन केले जात आहे.

हुंकार ऐकायलाच हवा

औरंगाबादेत मराठवाड्यातील पहिल्या शाखेच्या स्थापनेला यंदा ३७ वे वर्ष असून, या निमित्ताने पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आठ जूनची जाहीर सभा ऐतिहासिक असणार आहे. सभेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा हुंकार ऐकायलाच हवा, ही टॅगलाईन घेऊन आम्ही सर्वत्र नागरिकांपर्यंत पोहचत आहोत. त्यासाठी शिवसैनिकांसह औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिक उत्सुक आहेत, असे शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...