आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणारे पोलिस अधीक्षकांच्या हिटलिस्टवर, एकवर्षात दोन वेळा मटका, जुगाराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची माहिती मागवली

हिंगोली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींची धुलाई झाल्यानंतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा नंबर लावला जाणार असल्याची चर्चा होती.

जिल्ह्यात हिटलिस्टवर असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना बोलावून त्यांची धुलाई करणाऱ्या पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी आता एका वर्षात दोन वेळा मटका व जुगाराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची माहिती मागवली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत अवैध व्यवसाय करणाऱ्यांनाही पाचारण करून त्यांना ‘तंबी’ दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हिंगोली जिल्हयात चोरी, घरफोडीचे गुन्हे रोखण्यासाठी नूतन पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी या गुन्हेगारांची माहिती मागवली होती. सध्या शहरासह जिल्हाभरात असलेल्या या गुन्हेगारांना हजर करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानंतर बुधवारी ११ तारखेला दिवसभरात ५० जण हजर करण्यात आले. त्यांची पोलिस अधीक्षक कलासागर यांनी चांगलीच धुलाई करून तंबी दिली.

त्यानंतर आता मागील वर्षभरात जुगार व मटक्याचे दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेल्या आरोपीची माहिती सादर करण्याचे आदेश कलासागर यांनी दिले आहे. यामध्ये त्या व्यक्तीचे नांव, पत्ता, मुळ गाव, कितीवेळेस गुन्हे दाखल झाले आदी माहितीचा समावेश आहे. त्यानुसार आता स्थानिक गुन्हे शाखेसोबतच जिल्हयातील ठाणेदारांकडून सदर माहिती शोधून पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसांतच त्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर करून त्यांनाही ‘तंबी’ दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

३०० पेक्षा अधिक आरोपींची यादी तयार होणार
यामध्ये प्रत्येक पोलिस ठाणेनिहाय माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यात जिल्हयातील १३ पोलिस ठाण्यांतर्गत किमान ३०० पेक्षा अधिक आरोपींची यादी तयार होणार आहे. या यादीमध्ये जास्तीत जास्त वेळेस गुन्हे दाखल झालेल्या आरोपींना पहिल्या टप्प्यात तर त्यानंतर इतर आरोपींना दुसऱ्या टप्प्यात हजर राहण्याचे आदेश दिले जाणार आहेत.

आरोपींना आता कोरोनाचाच आधार
जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींची धुलाई झाल्यानंतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा नंबर लावला जाणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांची माहिती मागविल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला. पोलिस अधीक्षकांकडून मिळणाऱ्या ‘तंबी’ ने अनेकांची पाचावरधारण बसली आहे. त्यामुळे आता या आरोपींनी कोरोनाचा आधार घेण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा सुरु झाली आहे.