आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिका:सातव्या दिवशी पाण्याचा टँकर लाॅबी तर फायदा घेत नाही नाॽ ; सुनावणीप्रसंगी खंडपीठाकडून विचारणा

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरवासीयांना चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करू, असे महापालिकेने सांगितले हाेते. प्रत्यक्षात दिवाळीतही सहाव्या आणि सातव्या दिवशी नागरिकांना पाणी मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जुनी पाइपलाइन बदलून नवीन जीआय पाइप टाकण्यासाठी शासनदरबारी प्रलंबित २२० कोटी रुपयांच्या प्रस्तावास त्वरित मान्यता देण्याचे आदेश न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी दिले. “पाणीपुरवठा सहाव्या आणि सातव्या दिवशी होत असल्याने याचा फायदा टँकर लॉबी तर घेत नसेलॽ जलकुंभातून पाणी काढून टँकरद्वारे पुरवले जात नसेल नाॽ’ अशी शंकाही खंडपीठाने व्यक्त केली.

शहरातील विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यासंबंधी औरंगाबाद खंडपीठाने स्वत: दाखल करून घेतलेली जनहित याचिका सोमवारी (२१ नोव्हेंबर) सुनावणीस निघाली. न्यायालयाचे मित्र अॅड. सचिन देशमुख यांनी ऐन दिवाळीत नागरिकांना सहाव्या आणि सातव्या दिवशी पाणीपुरवठा झाल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. दिवाळीत किमान चौथ्या दिवशी पाणीपुरवठा व्हावा, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली होती. परंतु महापालिका प्रशासन यात अयशस्वी ठरल्याचे निदर्शनास आणून दिले. खंडपीठाने यासंबंधी तीव्र नाराजी व्यक्त केली. १६८० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन समितीला मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. पाणीपुरवठा चौथ्या दिवशी का होत नाही, यावर काही मार्ग काढता येईल का, यासाठी विचार करावा, असे निर्देश दिले. याचिकेत मूळ याचिकाकर्ता अॅड. अमित मुखेडकर यांनी काम पाहिले. मजीप्रातर्फे अॅड. विनोद पाटील, मनपाच्या वतीने अॅड. संभाजी टोपे, महावितरणकडून अॅड. अनिल बजाज, न्यायालयाचे मित्र म्हणून अॅड. सचिन देशमुख, राज्य शासनातर्फे सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे, केंद्रातर्फे अॅड. अजय तल्हार यांनी काम पाहिले.

जुनी पाइपलाइन बदलणे गरजेचे १६८० कोटी रुपयांची नवीन पाइपलाइन कार्यान्वित होईपर्यंत जुनी पाइपलाइन बदलून जीआय पद्धतीची पाइपलाइन टाकण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने २२० कोटी रुपयांचा प्रस्ताव २९ ऑगस्ट २०२२ रोजी शासनाला पाठवण्यात आला होता. पाणीपुरवठा चौथ्या दिवशी करावयाचा झाल्यास जुनी पाइपलाइन बदलावी लागेल, असे अॅड. सचिन देशमुख यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. खंडपीठाने २२० कोटींच्या पाइपलाइनच्या प्रस्तावास त्वरित मान्यता प्रदान करण्याचे आदेश दिले.

चाैथ्या दिवशी पाणी देण्याचा प्रयत्न करा पाणीपुरवठा चौथ्या दिवशी होत नाही. अजूनही नागरिकांना सहाव्या आणि सातव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्यामुळे टँकर लॉबी टाकीतून पाणी काढत आहे का, अशी शंका खंडपीठाने सुनावणीप्रसंगी व्यक्त केली. विभागीय आयुक्त अध्यक्ष असलेल्या समितीला आदेश देत पाणीपुरवठा चौथ्या दिवशी कसा करता येईल यासंबंधी विचार करण्यास सांगितले. सहायक सरकारी वकिलांनी जनतेच्या हितासाठी शासनासोबत चर्चा करावी, असे निर्देश दिले.

बातम्या आणखी आहेत...