आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पादचारी हैराण:टीव्ही सेंटर चौकात दीड तास ट्रॅफिक जाम; भरउन्हात पोलिस, पादचारी हैराण

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील टीव्ही सेंटर चौकात सोमवारी सायंकाळी ६ ते ७:३० वाजेपर्यंत वाहतूक जाम होत होती. त्यामुळे ३ ते ५ मिनिटांऐवजी वाहनचालकांना १५ ते २० मिनिटे चौकातून वाहन काढण्यासाठी लागले. सिग्नल टायमिंग बंद असल्याने चालकांनी चहुबाजूने मनमानी वाहन चालवल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कांेडी झाली होती. त्यावर वाहतूक पोलिसांचे कोणतेच नियंत्रण नव्हते. चौकातील चौकीचे पोलिस त्यांच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे गाडीतील पोलिसांना देखील ट्रॅफिकमध्ये ताटकळत उभे राहावे लागले.

शहरातील प्रमुख चौकांपैकी टीव्ही सेंटर चौक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दुपारच्या सत्रात तापमान ४० अंश सेल्सियस होते. त्यामुळे लोकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते. वाहतुकीला चाप बसला होता. मात्र, सायंकाळी ४ वाजेनंतर लोक बाहेर पडण्यास सुरुवात झाली. पाच वाजेनंतरच रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहने धावू लागली. टीव्ही सेंटर चौक परिसरात मोठी बाजारपेठ आहे.

ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय, दवाखाने, शासकीय-निमशासकीय कार्यालये, महाविद्यालय, संस्था, नागरी वसाहती, सलीम अली सरोवर, स्वामी विवेकानंद गार्डन, हर्सूल, जाधववाडी, जळगाव रोड, नाक्याकडे जाणाऱ्या वाहनांची सहा ते सात वाजेपर्यंत संख्या वाढली. त्यात सिग्नल टायमिंग बंद होते. त्यामुळे चहुबाजूने येणाऱ्या वाहनचालकांनी मनमानी पद्धतीने वाहने चालवून चौकात गर्दी केली. वाहनचालक शिरजोरी करून वाहन चालवून ट्रॅफिकमधून बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. मात्र, या बेशिस्तीमुळे वाहतूक अधिक ठप्प होण्यास कारणीभूत ठरली. याचा त्रास वाहनचालकांसह पादचारी, पोलिसांना सोसावा लागला.

बातम्या आणखी आहेत...