आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफा दुकानात आलेल्या बुरखाधारी महिलेने हातचालखीने एका क्षणात नवरत्नाची २४ ग्रॅम सोन्याची बांगडी पर्सखाली लपवली. नंतर पैसे आणण्याचा बहाणा करून पर्स व बांगडीसह बाहेर आली व पसार झाली. मोंढा नाका येथील मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ज्वेलरी दालनात शनिवारी सायंकाळी ६.२० वाजता ही घटना घडली. याप्रकरणी १ लाख २ हजार रुपयांची बांगडी चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जिन्सी पोलिसांनी रविवारी संशयित महिलेसह दाेघांना ताब्यात घेतले.
नववर्षानिमित्त या दुकानात सायंकाळच्या वेळी उपस्थित सर्व ग्राहकांना केक कापण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र, बुरखाधारी महिलेने नकार देत घाई असल्याचे सांगत लवकर सोन्याच्या बांगड्या दाखवण्यास सांगितले. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अशोक गायकवाड यांनी दागिने दाखवणे सुरू केले. अशोेक हे इतर दागिने दाखवण्यासाठी वळताच महिलेसमोर काउंटरवर ठेवलेल्या दोनपैकी एक नवरत्न बांगडी पर्सखाली लपवली. त्यानंतरही बराच वेळ उत्सुकतेने इतर दागिने पाहिले. एक राणीहार पाहिल्यानंतर ही महिला अशाेक यांना ‘बाहेर गाडीतील चालकाला घरून पैसे आणायला सांगून येते,’ असे म्हणून बाहेर गेली. बराच वेळ होऊनही ती परत आली नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. ही महिला हिंदीत बाेलत हाेती.
सीसीटीव्हीमुळे उघडकीस आली चाेरी, संशयित महिला ताब्यात
रात्री साडेदहा वाजता दिवसभराचा हिशेब करताना मात्र अशोक यांना एक सोन्याची बांगडी कमी दिसली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ६.२१ वाजता बुरखाधारी महिला पर्सखाली बांगडी लपवतान दिसून आली. त्यानंतर त्यांनी स्टेशन हेड थमिस गफूर यांना ही बाब कळवली. पाेलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. रविवारी सकाळी एका रेकॉर्डवरील गुन्हेगार महिलेला त्यांनी संशयावरून ताब्यात घेतले. तिच्यासोबत आलेल्या रिक्षाचालकाला देखील ताब्यात घेतले. सदर महिलेला यापूर्वी सिटी चौक पोलिसांनी अटक केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.