आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक केल्याने एकाची आत्महत्या; संस्थाचालकावर गुन्हा दाखल

परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातील शेखराजूर येथे नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक केल्याने 37 वर्षीय नारायण किशनराव पवार यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार 16 सप्टेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालम तालुक्याच्या शेखराजूर येथील नारायण किशनराव पवार यांना सेवक तर त्यांची पत्नी स्वाती पवार (32) यांना स्वयंपाकी म्हणून गावातीलच अंध व मूकबधिर शाळेवर नोकरीवर घेण्याचे आमिष शाळेचे संस्थापक विठ्ठल संभाजी गुटे (रा.नांदेड) यांनी दाखविले.

दरम्यान शाळेसाठी नारायण पवार याची दीड एकर जमिन दान म्हणून घेतली, त्यावर शाळा बांधली. पण त्यानंतर सातत्याने नोकरीची मागणी करून ही त्यांना व त्यांच्या पत्नीला शाळेवर नोकरी न मिळाल्याने संस्थाचालकाच्या फडवणुकीस कंटाळून नारायण किशनराव पवार यांनी त्याच शाळेच्या इमारतीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर मृताच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली आहे. त्यात "मी नारायण पवार आत्महत्या करीत आहे. कारण विठ्ठल संभाजी गुटे, या संस्थाचालकाने मला नोकरीला लावतो, असे म्हणून 2006 मध्ये माझी दीड एकर जमीन घेतली आणि मला नोकरीला लावले नाही.

माझ्यावर उपासमारीची वेळ आणली, माझी जमीन शासनाने परत मिळवून द्यावी, ही माझी शेवटची विनंती", या आशयाचा मजकूर आढळला आहे. याप्रकरणी पालम पोलिसात मयताची पत्नी स्वाती नारायण पवार हिने फिर्याद दिली आहे. त्यावरून नारायण पवार याला आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी आरोपी विठ्ठल संभाजी गुटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल बहात्तरे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...