आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:दर दोन दिवसांनंतर एक विद्युत अपघात;एकट्या महावितरणच्या चुकीमुळे 273

संतोष देशमुख |औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व जिल्ह्यांत इमारतीला स्पर्श करून गेलेल्या व जमिनीकडे झुकलेल्या विद्युतवाहिन्या, उघडे रोहित्र जीवघेणे ठरत आहेत. परिणामी २०२० ते डिसेंबर २०२२ दरम्यानच्या पावणेतीन वर्षांत ४९१ विद्युत अपघात झाले. त्यातील २७३ म्हणजे ५५ टक्के अपघातांना महावितरण तर २१८ अपघातांना लोक जबाबदार आहेत. गंभीर बाब म्हणजे यात १४० जणांना मृत्यू झाल्याची आकडेवारी महावितरणच्याच अहवालातून दिव्य मराठीच्या हाती लागली आहे.

वीज ग्राहकांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत वीज वितरण आणि पुरवठ्याच्या पायाभूत सेवासुविधांचा व सक्षमीकरणाचा अभाव आहे. ग्राहक संख्येनुसार रोहित्र बसवलेले नाहीत. मनुष्यबळ अपुरे आहे. उघडे रोहित्र आहे. क्रांती चौक ते चिकलठाण, सिडको ते हर्सूल आदी भागात जमिनीकडे विद्युतवाहिन्या झुकलेल्या आहेत.

रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तींच्या डोक्याला विद्युत तारांचा स्पर्श होईल, अशी भयावह स्थिती अनेक ठिकाणी आहे. सर्वात गंभीर म्हणजे ३५ हजारांवर इमारतीला वाहिन्या चिकटून गेलेल्या आहेत. विद्युत खांब व वाहिन्या जीर्ण झालेल्या असून खांबाला आधार देण्यात आलेला व वाहिन्यांना जोड देऊन वीजपुरवठा केला जातोय. उच्च दाब व कमी दाबाने वीजपुरवठा होऊन वीजपुरवठा खंडित होतो. रोहित्र जळणे, संसारोपयोगी वस्तू जळणे व अपघातासही कारणीभूत ठरत आहे.

ग्राहक मंचात दाद मागावी
३० वर्षांच्या विद्युत तारा, धोकादायक उघडी उपकरणे, लोंबकळणाऱ्या तारा आणि शून्य मेंटेनन्स विद्युत अपघातास कारणीभूत आहेत. यात नाहक लोकांचे, प्राण्यांचे बळी जात आहेत. अपघात झाल्यानंतर तातडीची मदत अपघात झाल्यापासून आठ दिवसांच्या आत देणे आणि नुकसान भरपाई एक ते दीड महिन्यात देणे अपेक्षित असते. ग्राहकांनी ग्राहक मंचात दाद मागावी. हेमंत कापडिया, ग्राहक प्रतिनिधी, ऊर्जा मंच.

जिवलग गेले; भरपाईही नाही
कंडक्टर तुटून अंगावर पडल्याने िबडकीनचे अनीस इलियास शेख यांचा तर हर्सूल येथील आदित्य सूरज साबळे आणि अदिती या दोन भावंडांचा खेळत असताना ११ केव्ही विद्युतवाहिनी अंगांवर पडल्याने होरपळून, तर अंघोळ करताना कमलबाई बरडवाल यांचा जबर शॉक लागून मृत्यू झाल्याचा समावेश आहे. नियमानुसार त्यांना महावितरणकडून प्रत्येकी ४ लाखांची भरपाई मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात एक रुपयाही मिळालेला नाही.

का होतात विद्युत अपघात, का मिळत नाही भरपाई?
विद्युत वाहिन्यांपासून अंतर योग्य नियमाप्रमाणे न राेखणेे, अनधिकृत वीज वापर, झुकलेल्या वा तूटलेल्या तारा, उघडी रोहित्रे यारमुळे अपघात होतात. हे टाळण्यासाठी प्रशासनाने देखभाल व दुरुस्तीवर भर देणे, चोरून वीज न वापरणे, सुरक्षा साधनांचा वापर करणे, दाटीवाटीच्या भागात घराला स्पर्श केलेल्या विद्युतवाहिन्या काढून तेथे एअर बेंच केबल टाकणे गरजेचे आहे.

विजेचा अपघात झाल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ चे कमल १६१ अन्वये अपघाताबाबतची सूचना अपघात घडल्यापासून २४ तासांत निरीक्षकांना देणे बंधनकारक आहे. तरच नुकसान भरपाईस पात्र ठरू शकता. ०२४०२३३४२१० या क्रमांकावर माहिती द्यावी.

मृत्यू झाल्यास ४ लाख रुपये तर जखमींना ४० हजारांपर्यंत मदतीची तरतूद आहे. घरगुती उपकरण जळीत प्रकरणात ग्राहक सुरक्षा साधने बसवत नाहीत. त्यामुळे भरपाई मिळत नाही. मिनी एचआर सेक्रेट ब्रेकर, जे ग्राहक २.५ किलो वॅटच्यावर विजेचा वापर करतात त्यांनी अर्थ लिकेज सेक्रेट ब्रेकर बसवावेत.

थेट प्रश्न
एक्स्पर्ट व्ह्यू नि. वा. मदाने, विद्युत निरीक्षक
प्रश्न : ५५ टक्के अपघातांना महावितरण जबाबदार आहे असे आपलीच आकडेवारी सांगते. यास जबाबदार संबंधितांवर काय कारवाई केली?
उत्तर : मी नुकताच पदभार स्वीकारला आहे. संपूर्ण विषयाचा दोन दिवसांत आढावा घेतो.
प्रश्न : अपघातग्रस्तांच्या वारसांना वेळेत नुकसान भरपाई का मिळाली नाही?
उत्तर : बऱ्याचदा कागदपत्रांची पूर्तता वेळेत केली जात नाही. विलंब का झाला हे जाणून घेऊन कारवाई करू.
प्रश्न : हे अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना आहेत?
उत्तर : तातडीने उपाययोजना केल्या जातील. वसाहतीत विद्युतवाहिन्यांना स्पर्श करतील अशा पद्धतीने बांधकाम झाले आहे. ते बदलले पाहिजे.
सचिन तालेवार, मुख्य अभियंता

बातम्या आणखी आहेत...