आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वऱ्हाडाचा टेम्पो उलटला:अपघातात एक ठार, 36 जखमी; चालकाचा ताबा सुटल्याने मुखेड तालुक्यात घडली भीषण घटना

नांदेड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जखमींना रुग्णवाहिकेतून मुखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले

मुखेड तालुक्यातील सलगरा (बु.) जवळील राज्य महामार्गावरील इंद भारत ऊर्जा कंपनीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने वऱ्हाडाचा टेम्पो उलटला. यात एक तरुण ठार, तर ३६ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.१५) सकाळी ११ वाजता घडली. प्रशांत जनार्दन सूर्यवंशी (२२) असे मृताचे नाव आहे. जखमीत ९ वर्षांची एक मुलगी, २९ महिला, ६ पुरुषांचा समावेश आहे. प्रथमोपचार करून २२ जणांना गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात पाठवण्यात आले.

लातूर जिल्ह्यातील मौजे हाळी (ता. उदगीर) येथील ४०-४५ जणांना घेऊन वर मंडळीचे वऱ्हाड आयशर टेम्पोने (एमएच ०४ ईबी ३५२५) बिलोली तालुक्यातील कार्ला येथे १५ रोजी सकाळी ११ वाजता जात होते. दरम्यान, चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो सलगरा बु. येथील राज्य महामार्गावर उलटला. या अपघातात टेम्पो १० मीटर घसरत जाऊन वळल्याने मोठा अपघात झाला. समोरून कोणतेही वाहन येत नसताना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. यात प्रशांत जनार्दन सूर्यवंशी (२२) हा तरुण जागीच ठार झाला. तर ३६ जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सलगरा बु. व खरब खंडगाव येथील नागरिकांनी जखमींना रुग्णवाहिकेतून मुखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद पाटील, डॉ. शोभा देवकत्ते, डॉ. उमाकांत गायकवाड, डॉ. अंजली कवळे, आरोग्य कर्मचारी लखन पवार, प्रशांत बनसोडे, परिचारिका बिजला फतेलसकर, राधा गिनेवाड, पदमा पांचाळ, संगीता यमलवाड, जयश्री गायकवाड, सुषमा केंद्रे, योगेश पावरा, संजय वळवी, संजय पावरा, रवी धुळे, बादल रिंदकवाले, श्रीनिवास होळकर, आदेश राठोड, शंकर गायकवाड, प्रशांत बनसोडे सहपरिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी जखमींवर प्रथमोपचार केले.

बातम्या आणखी आहेत...