आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धम्मदीक्षा:एक हजार चर्मकार बांधव 14 ऑक्टोबरला मिलिंद कॉलेजच्या प्रांगणात घेणार धम्मदीक्षा

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील एक हजार चर्मकार समाजबांधव १४ आॅक्टोबर रोजी धम्मदीक्षा घेणार आहेत. मिलिंद कॉलेजच्या प्रांगणात दुपारी एक वाजता हा बौद्ध धर्म प्रवेश सोहळा होणार आहे. आंबेडकरवादी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रावण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर औरंगाबादेत पहिल्यांदाच धर्मांतर होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मी गेल्या ४० वर्षांपासून आंबेडकरवादी चळवळीत काम करत आहे. वेळोवेळी माझ्या मनात बौद्ध धर्मात प्रवेशाचा विचार येत होता. गेल्या वर्षी मी त्याचा निर्धार केला आणि माझ्यासोबत माझे कुटुंबीय, आप्त आणि आंबेडकरी विचार मानणाऱ्यांना घेऊन बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचे ठरवले. चर्मकार समाजावर नेहमी डाॅ. आंबेडकरांना दगाफटका करणारी जमात असा ठपका मारला जातो. दुसरीकडे हिंदू धर्मातील उच्चवर्णीयच मागासांवर अत्याचार करतात.

आपण किती दिवस हा प्रकार सहन करायचा, असा प्रश्न विचारून मी अनेकांचे मन वळवले. डाॅ. आंबेडकरांनी महाराष्ट्रातील सुमारे ४५० जातींना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आरक्षणाचा फायदा मिळवून दिला. डाॅ. आंबेडकर हेच समाजाचे तारणहार, मुक्तिदाता, मार्गदाता असल्याने त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हिंदू धर्माचा त्याग करत असल्याचे गायकवाड म्हणाले. मिलिंद दाभाडे यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. माझ्याकडे नोंदणी केलेल्यांशिवाय अन्य कोणाला धम्मदीक्षा घेण्याची इच्छा असेल तर त्यांनी सचिन निकम ९२७००४९४५८, प्रवीण बोर्डे ८१८००००७७७ यांच्याशी संपर्क साधावा, असेही गायकवाड यांनी आवाहन केले. या वेळी रतनकुमार पंडागळे, प्रा. सिद्धोधन मोरे, आनंद कस्तुरे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...