आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजचोरी पडली महागात:आरोपीला एक वर्षाचा तुरुंगवास; गडहिंग्लज न्यायालयाचा निकाल

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यातील ढोलगरवाडी (ता.चंदगड) येथील एका लघुदाब औद्योगिक ग्राहकास वीजचोरी करणे महागात पडले आहे. वीजचोरी प्रकरणी भाऊराव संभाजी पाटील (वय 40) याला गडहिंग्लज न्यायालयाने एका वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या ग्राहकांने वीजमीटरमध्ये छेडछाड करून 24 हजार 675 वीज युनिटची, आर्थिक मूल्याप्रमाणे 2 लक्ष 50 हजार रुपयांची वीजचोरी केली होती.

19 नोव्हेंबर 2015 रोजी ढोलगरवाडी (ता.चंदगड) येथील वीजग्राहक भाऊराव संभाजी पाटील यांच्या सातेरी राईस मिलच्या वीजमीटरची पंचासमक्ष घटनास्थळी तपासणी करण्यात आली होती. प्रथमदर्शनी वीज मीटरचे पीव्हीसी सील तुटलेले व स्टिकर सील संशयास्पद स्थितीत आढळून आले. ॲक्युचेक यंत्राच्या सहाय्याने वीजमीटर तपासणी केली. या तपासणीत वीजमीटर संथ गतीने फिरत असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला. पंच व ग्राहकासमक्ष सक्षम अधिकाऱ्यांनी वीजमीटर सील केले.

वीजमीटरची गडहिंग्लज येथे 20 नोव्हेंबर 2015 रोजी वीजभार तपासणी करून पंचनामा करण्यात आला. या वीजभार तपासणीत वीजमीटर 75.94 टक्के संथ गतीने फिरत असल्याचे आढळून आले. पुन्हा पंच व ग्राहकासमक्ष सक्षम अधिकाऱ्यांनी वीजमीटर सील केले. 21 नोव्हेंबर 2015 रोजी कोल्हापूर येथील वीजतपासणी प्रयोगशाळेत ग्राहकासमक्ष वीजमीटर तपासले. या तपासणीत वीजमीटरमध्ये वीजवापर कमी नोंदवला जावा, अशा पद्धतीने फेरफार केल्याचे सिद्ध झाले.

ग्राहकाने सदरील वीजचोरीच्या 22 फेब्रुवारी 2014 ते 19 नोव्हेंबर 2015 या निर्धारित 19 महिने कालावधीत 24 हजार 675 युनिटची वीजचोरी केली. ग्राहकास वीजचोरीच्या युनिटचे आर्थिक मूल्यानुसार 2 लाख 50 हजार रुपये व तडजोडीचे रक्कम 1 लाख 50 हजार रुपये इतके बिल देण्यात आले होते. मात्र नोटीस देऊनही ग्राहकाने वीजबिल भरले नसल्याने महावितरणच्या फिर्यादीनुसार विद्युत कायदा 2003 कलम 135 व 138 अन्वये भाऊराव संभाजी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी झालेल्या सुनावणीत गडहिंग्लज न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची साधी कैद व 10 हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद ही शिक्षा ठोठावली आहे.सदरील प्रकरणी पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) निवृत्त कमांडर शिवाजी इंदलकर यांचे मार्गदर्शन लाभले. भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अमित बोकील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲड. सुनील तेली यांनी कामकाज पाहिले.

बातम्या आणखी आहेत...