आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीनंतर भविष्याचे वेध:राज्यातील 955 ‘आयटीआय’मध्ये 22 जूनपर्यंत ऑनलाइन प्रवेश, सरकारी संस्थांमध्ये नाममात्र शुल्क

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देणाऱ्या राज्यात ४१७ सरकारी, तर ५३८ खासगी आयटीआय आहेत. एकूण ९५५ आयटीआयमध्ये ७९ ट्रेड्स आहेत. १ लाख प्र‌वेश क्षमतेच्या या आयटीआयमध्ये विद्यार्थी राज्यातील कुठल्याही केंद्रांतून प्रवेश घेऊ शकतात. उद्योग क्षेत्रात हमखास नोकरी किंवा स्वत:च्या व्यवसायासाठी आयटीआय प्रशिक्षण हा विद्यार्थ्यांसमोर आता सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहे. विशेष म्हणजे आयटीआयनंतर पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षात तर पॉलिटेक्निकनंतर बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेऊन उच्च तंत्रशिक्षण घेण्याचे स्वप्नही साकार करता येईल.

आयटीआय करण्याकडे सध्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा ओढा वाढला आहे. राज्यातील एक लाख जागांसाठी दरवर्षी पाच लाख विद्यार्थी अर्ज करतात. १७ जूनपासून आयटीआयची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात सर्वसाधारण संवर्गातील ३०७ शासकीय आयटीआय आहेत. त्याशिवाय आदिवासींसाठी-६१, महिलांसाठी-१५, आदिवासी आश्रमशाळा-२८, अनुसूचित जाती आणि नवबौद्धांचे-४, तर मुस्लिम अल्पसंख्याकांसाठी २ आयटीआय आहेत. राज्यातील ३५८ तालुक्यांत एकूण ४१७ शासकीय आयटीआय आहेत. या आयटीआयमध्ये प्रवेशासाठी केवळ १०० ते १५० रुपये शुल्क आकारले जाते. शैक्षणिक शुल्कापोटी अनुसूचित जातीकडून ९५०, तर सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून १ हजार ९५० रुपये आकारण्यात येते. पण मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क परत देण्याची तरतूद आहे. अर्ज केलेल्यांना छात्रवृत्तीही दिली जाते. ५३८ खासगी आयटीआयसह राज्यातील ३५८ तालुक्यांत एकूण ९५५ आयटीआय आहेत. केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन अर्ज करता येतात. त्यानंतर राज्यातील कुठल्याही आयटीआयमध्ये ऑफलाइन प्रवेश अर्ज सादर करणे गरजेचे आहे. ऑफलाइन अर्ज केलेल्यांंना मेरिटनुसार महाराष्ट्रातील हव्या त्या आयटीआयमध्ये ट्रेड्सला प्रवेश मिळू शकतो. नाममात्र शुल्काचे हे प्रशिक्षण पूर्ण केले तर उद्योगात नोकरीची शाश्वती वाढते. शिवाय स्वत:चा व्यवसाय करण्याचाही पर्याय राहतो.

प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयटीआयतर्फे मोफत गणवेश दिला जातो. २२ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पाल्यांच्या पालकांसाठी आयटीआयमध्ये सकाळी दहा ते अकरापर्यंत समुपदेशन केले जात आहे.

७९ ट्रेड्स उपलब्ध
राज्यातील आयटीआयमध्ये ७९ ट्रेड्स उपलब्ध आहेत. एकाच वेळी विविध ट्रेड्ससाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. एक वर्ष कालावधीचे २३ ट्रेड्स आहेत. दोन वर्षे कालावधीचे-३२, तर नॉन इंजिनिअरिंगच्या एक वर्षाचे २४ ट्रेड्स आहेत. ट्रेड्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना उच्च तंत्रशिक्षण घेण्याची इच्छा असेल तर ती संधीही आहे. मुलींसाठी प्रत्येक ट्रेड्समध्ये ३० टक्के आरक्षण आहे. आयटीआय केल्यानंतर पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. पॉलिटेक्निक झाल्यानंतर बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेता येऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...