आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंस्टाग्रामवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारुन त्याच्यावर विश्वास ठेवणे एका शिक्षिकेला चांगलेच महागात पडले. स्वत:ला विदेशातला डाॅ. जॅकसन विलिअन्स असल्याचे सांगून भेटवस्तू पाठवल्याचे सांगितले. त्यानंतर अज्ञातांनी भेटवस्तुच कर व इतर विविध कारणे सांगून शिक्षिकेकडून तब्बल 1 लाख 95 हजार रुपये उकळले. औरंगाबादमध्ये समोर आलेल्या प्रकारात एमआयडिसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिकलठाणा एमआयडिसी कुटूंबासोबत राहणऱ्या 36 वर्षीय शिक्षिका मागील काही दिवसांपासून इंस्टाग्राम वर सक्रिय झाली होती. विदेशातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे त्या काम करतात. महिन्याभरापुर्वी इंस्टाग्रामवर त्यांना डाॅ. जॅकसन विलिअन्स नावाच्या प्रोफाईवरुन फ्रेंड रिक्वेस्ट प्राप्त झाली. त्यांनी स्विकारली देखील. त्यानंतर त्यांच्यात रोज बोलणे सुरू झाले. मैत्री दिवसेंदिवस वाढत गेल्यानंतर काही दिवसातच सदर प्रोफाईल धारकाने विश्वास जिंकत व्हॉट्स ऍप क्रमांकाची मागणी केली. शिक्षिकेने देखील व्हाॅट्स क्रमांक शेअर केला. त्याच्या दोनच दिवसात त्याने मी तुमच्या मुलांसाठी महागडे चॉकलेट्स, भेटवस्तु व टेडी पाठवत आहे, असे सांगून पत्ता घेतला.
कर व विविध कारणे सांगितले
25 मे रोजी महिलेला अनोळखी क्रमांकावरुन कॉल प्राप्त झाला. आम्ही दिल्ली विमानतळावरुन बोलत असून तुमच्यासाठी आलेले पार्सल साठी कस्टम ड्युटी भरावा लागेल, असे सांगत बँक खाते क्रमांक दिला. त्यावर महिलेने 45 हजार रुपये भरले. त्यानंतर सदर क्रमांकावरुन चार टप्प्प्यांमध्ये विदेशी रक्कम, त्यावरील कर असे विविध कारणे सांगत अनुक्रमे 30 हजार, 45 हजार, 75 हजार रुपये मागितले व शिक्षिका ते सर्व रक्कम भरत गेली. दोन दिवसांनी मात्र पुन्हा त्यांना 3 लाख 50 हजार रुपयांची मागणी झाल्यावर मात्र शिक्षिकेला आपली फसवणूक होतेय, हे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. अखेर 20 जwन रोजी याप्रकरणी एमआयडिसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक विठ्ठल पोटे अधिक तपास करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.