आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष:विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत क्रमांक पटकावणाऱ्यांपैकी 1 टक्काच मुले पुढे वळली वैज्ञानिक प्रयोगांकडे

औरंगाबाद / श्रीकांत सराफ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिव्य मराठीने सहा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचे केले सर्वेक्षण

२१व्या युगात प्रवेश करणाऱ्या मुलांमध्ये शाळेतच विज्ञानाविषयी आवड जोपासली जावी, त्यांच्यातून नव्या पिढीचे वैज्ञानिक तयार व्हावेत यासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर २००८-०९ पासून ‘इन्स्पायर’ ही विज्ञान प्रदर्शनाची योजना अमलात आली. कोरोना संकटाचा काळ वगळता दरवर्षी त्यात हजारो विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केले. गेल्या काही वर्षांत पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचे पुढे काय झाले याचा शोध दिव्य मराठीने घेतला. सहा जिल्ह्यांतील ४० विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले तेव्हा क्रमांक पटकावणाऱ्यांपैकी फक्त एक टक्काच मुले वैज्ञानिक प्रयोगांकडे वळली. घरची स्थिती, पालकांचा दबाव आणि शाळेतील शिक्षकांसारखे प्रेरणादायी मार्गदर्शन नसल्याने ९९ टक्क्यांना प्रयोग, संशोधनाची वाट चालणे शक्य झाले नाही, असे निदर्शनास आले आहे.

एपीजे अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती झाल्यावर देशभर विज्ञान विषयाची चर्चा वाढली. शाळेतच मुलांमध्ये विज्ञानाचा संस्कार केला पाहिजे, असा कलाम यांचा आग्रह होता. त्यानुसार २००८ मध्ये इन्स्पायरची योजना जाहीर करण्यात आली. प्रत्येक शाळेने त्यात सहभागी झालेच पाहिजे, असा आग्रह धरण्यात आला. प्रयोगासाठी निधीही देण्यात आला. राष्ट्रीय पातळीवर चमकणाऱ्यांना थेट कलाम यांच्याशी बोलण्याची संधी, असेही जाहीर करण्यात आले. त्यामुळे पाहता पाहता इन्स्पायर प्रदर्शन स्पर्धा विद्यार्थीप्रिय झाली. मात्र, या स्पर्धेमुळे मुलांमध्ये विज्ञानाविषयी निर्माण झालेली आवड किती प्रगत होऊ शकली याचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने केला.

आणखी सखोल मार्गदर्शन, मदत गरजेची : विज्ञान, संशोधनाची आवड निर्माण होणे एवढाच इन्स्पारयचा उद्देश. खरे तर त्यापुढे सखोल मार्गदर्शन, मदतीची गरज आहे. घरूनही पाठबळ हवे असते. प्रयोगासाठी पैसाही लागतो. हे सर्व नसल्याने अगदी बोटावर मोजण्याइतकीच मुले वैज्ञानिक प्रयोगांच्या वाटेवर चालतात, असे गेल्या २२ वर्षांपासून बाल विद्या मंदिर शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि कायम विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनात पुढाकार घेणारे बाळासाहेब चोपडे यांनी सांगितले.

नव्याने विचार करावा लागेल
मुलांना प्रोत्साहनापुरते ठेवायचे की त्यापुढे न्यायचे याचा नव्याने विचार करावा लागेल. प्रयोगशील मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था तयार झाली तर नव्या पिढीचे वैज्ञानिक तयार होतील. प्रख्यात वैज्ञानिक रघुनाथ माशेलकरांनीही नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनमध्ये हाच मुद्दा मांडला आहे. - प्रा. डॉ. रंजन गर्गे, ज्येष्ठ विज्ञान प्रसारक, माजी प्राचार्य, शाज्ञाविम.

पारितोषिकप्राप्त ४० विद्यार्थ्यांचा सर्व्हे
सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, यवतमाळ, अकोला, अमरावती आदी सहा जिल्ह्यांतील २००८ ते २०१५ या काळातील ४० पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांशी संपर्क केला. त्यांना ४ प्रश्न विचारले. तुम्ही कोणता प्रयोग केला होता, दहावीनंतर कोणत्या शाखेत प्रवेश घेतला,कोणता नवीन प्रयोग केला, प्रयोग केला नसल्यास नेमके काय कारण.

सर्वेक्षणातील काही निष्कर्ष असे
{ स्पर्धेची गरज म्हणून प्रयोग केला. { दहावीनंतर पालकांनी अभ्यासासाठी दबाव आणल्याने प्रयोग करणे राहून गेले. { घरची परिस्थिती बिकट. प्रयोगासाठी पैसे नव्हते { शाळेत शिक्षकांकडून प्रेरणा मिळते. कॉलेजात अशी स्थिती नाही. { आर्थिक अडचणींमुळे एक मुलीने कला शाखा निवडली तर एका मुलास नोकरी करणे भाग पडले. { पारितोषिक विजेती ९७ टक्के मुले दहावीनंतर प्रयोगशील राहिली नसली तरी खासगी संस्था, कंपन्या, सरकारी नोकरीत महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...