आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरवासीयांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी औरंगाबाद फर्स्ट व्यापारी संघटना विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी कैलासनगर स्मशानभूमीत गॅस दाहिनी देण्यात आली. सर्वाधिक लोड असलेल्या या स्मशानभूमीची निवडही सर्वेक्षणानंतर झाली. गुरुवारी या स्मशानभूमीत जवळपास ८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, ३२ लाख रुपये खर्च करुन उभारलेल्या दाह वाहिनीत वर्षभरात फक्त १० जणांवरच अंत्यसंस्कार झाले, हे वास्तव समाेर आले आहे.
औरंगाबाद फर्स्टतर्फे सामाजिक बांधिलकी आणि गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने कोविडकाळात हा प्रकल्प उभारण्यात आला. वर्ष १९९७ मध्ये या वास्तूमध्ये विद्युत दाहिनी सुरू करण्यात आली होती. मात्र, रुढी परंपरांमुळे विद्युत दाहिनीत अंत्यविधी करण्यास नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. गेल्या वर्षी याच जागेत गॅसदाहिनी उभारण्यात आली. यामध्ये ४ महिन्यांपूर्वी शेवटचा अंत्यविधी झाला, तो म्हणजे मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धाचा. आतापर्यंत या दाहिनीमध्ये बहुतांश वेळा बेवारस मृतदेहांचेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
सरपणावर अंत्यविधीसाठी ४ ते ५ हजारांचा खर्च, दाहिनीत मात्र मोफत : सरपणावर अंत्यविधी करण्यासाठी ४ ते ५ हजारांचा खर्च नागरिकांना लाकडापोटी द्यावा लागतो. गॅस दाहिनीमध्ये कोणताही खर्च येत नाही. दोन्हीकडे अंत्यसंस्कार झाल्यावर संपूर्ण शरीर नष्ट होण्यासाठी साधारणत: ४ ते ५ तासांचा अवधी लागतो. सरपणावरही अग्नी दाहच मिळतो आणि गॅस दाहिनीतही अग्नी दाहच मिळतो.
चिमणीची उंचीही वाढवली : सहा ते आठ महिन्यांपूर्वी गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार केल्यावर परिसरात दुर्गंधी पसरली म्हणून नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवले होते. चिमणीची उंची २० ते २५ फुटांवर असल्याने हा प्रकार घडत होता. त्यामुळे चिमणीची उंची वाढवून ५० फूट करण्यात आली आहे. यामुळे दुर्गंधी पसरत नाही.
जनजागृतीसाठी पुढाकार घेणार
पुण्यात गॅस दाहिनीवर अंत्यविधी सवयीचे झाले आहेत. औरंगाबादेत मात्र रूढी, परंपरांचा पगडा अधिक आहे. महानगरपालिकेच्या खिडकीवर याविषयी जनजागृती झाली पाहिजे. पण, आता आम्हीच पुढाकार घेऊन जनजागृती करणार आहोत. विकासाकडे आम्ही सर्वांना घेऊन जाण्यासाठी हे पाऊल टाकले आहे. सर्वांचे सहकार्य मिळाले तर विकास वेगाने होईल.
- रणजित कक्कड, अध्यक्ष, औरंगाबाद फर्स्ट
मनपाकडून जनजागृती शून्य
मनपाकडे स्मशनाभूमीत अंत्यविधीचा परवाना घेण्यासाठी नागरिक जातात. परवान्याच्या पावतीवर लाकडावर, विद्युुत दाहिनी, गॅस दाहिनी असे तीन पर्याय दिले आहेत. विद्युत दाहिनी बंद पडून जमाना लोटला. लाकडावर आणि गॅस दाहिनीचेच पर्याय उरतात. मात्र, मनपाकडून नागरिकांना ना विचारणा होते, ना प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे या पर्यायाबद्दल जागरूकता होत नसल्याने यावर अंत्यविधी होत नसल्याचे दिसते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.