आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फक्त 10% चालकांनी भरले ई-चलान; 88% थकबाकी

औरंगाबाद / संतोष देशमुख2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात होणाऱ्या दंडात्मक कारवाईत पारदर्शकता व सुलभता यावी या उद्देशाने ई चलान यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात त्यामुळे केवळ १० टक्के दंडाचीच वसुली झाल्याचे धक्कादायक वास्तव "दिव्य मराठी'च्या पाहणीत उघडकीस आले आहे. वाहतुक पोलिसांनी १ जानेवारी ते १६ नोव्हेंबर दरम्यान शहर परिसरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २ लाख ९७ हजार २१८ नियमबाह्य वाहनांवर २० कोटी ६७ लाख ८६ हजार ६०० रुपयांची ई-चलानद्वारे दंड लावला. मात्र, त्यापैकी केवळ ३७०१७ चलानधारकांनी २ कोटी ४२ लाख २६ हजार ९५० रुपये दड भरला. तर ३५०१७ चलानधारकांनी १८ कोटी २५ लाख ५९ हजार ६५० रुपयांचा भरणाच केला नाही. परिणामी दंड न भरणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ८८.२९ टक्क्यांवर पोहोचलेे आहे.

पर्यटन, औद्योगिक, मेडिकल, शैक्षणिक, व्यावसायिक आणि आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढलेल्या औरंगाबाद शहरात आजघडीला १६.३४ लाख वाहने आहेत. तसेच दरदिवशी सरासरी १७५ वाहनांची भर पडत आहे. त्या तुलनेत रस्ते विकास झालेला नाही. तसेच वाहतूक नियम व अटींचे पालन केले जात नाही. परिणामी वाहतूक सेवा वारंवार ठप्प होते. अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागावी, रस्ते अपघात कमी व्हावे, पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी मोटार वाहन कायद्यानुसार पोलिस आणि आरटीओ नियमबाह्य वाहनांवर विविध कलमांतर्गत दंडात्मक कारवाई करतात. आधी जागेवरच दंड भरून वाहन सोडून घ्यावे लागत होते. आता मात्र नियमबाह्य वाहन चालवले की ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आणि चौकाचौकात उभे असलेले पोलिसांच्या मोबाइलमध्ये कैद होतात. त्यांच्यावर तात्काळ ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, ई-चलान थकवण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

येथे तपासा ई-चलानची माहिती ई-चलानची माहिती echallan.parivahan.gov.in वेबसाइट मिळते. त्यावर ऑनलाइन सर्व्हिसेसच्या चेक चलान स्टेटसवर क्लिक करा. वाहनाचा नंबर, लायसन्स नंबर टाकून ई-चलान एसएमएसच्या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर चलान मेसेज आला नाही तर डीएल किंवा व्हिकल नंबरचा पर्याय निवडून माहिती भरावी. गेट डिटेल्सवर क्लिक केल्यास चलान पेंडिंग असेल तर तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील. ई-चलानला दिले जाते आव्हान नवीन वाहतूक नियम व अटीनुसार दंडाच्या रक्कमेत भरमसाट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ई-चलान आले की, वाहनमालक, चालक हैराण होतात. मी तर नियमाचे उल्लंघनच केले नाही, म्हणून अनेक जण न्यायालयात दाद मागतात. तर दंडाची रक्कम वेळेत भरली नाही तर यासाठी कोर्टातच हेलपाटे मारावे लागतात. यात वेळेचा अपव्यय होतो. वाहनधारकांबरोबरच पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...