आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात यंदा पहिल्यांदाच तृतीयपंथीयांचा विचार केला आहे. तृतीयपंथीय आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी १.५ कोटीची तरतूद केली आहे. रविवारच्या (१२ मार्च) अधिसभेत २०२३-२४ वर्षासाठी ३०१.१४ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. त्यात ५१.७८ कोटींची वित्तीय तूट दाखवली आहे. विशेष म्हणजे एकूण अर्थसंकल्पात १९.४१ टक्के म्हणजेच ४२.५४ कोटींची तजवीज विद्यार्थ्यांसाठी केली आहे.
वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांनी हिंदी व मराठी कवितांचे मिश्रण करत अवघ्या २० मिनिटांत अर्थसंकल्प सादर केला. ‘पीपीटी’द्वारे अर्थसंकल्पातील तरतुदी त्यांनी सभागृहातील सदस्यांसमोर मांडल्या. प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आलेल्या अनुदानासह ३०१.१४ कोटींचा अर्थसंकल्प आहे. त्यात आगामी आर्थिक वर्षात ७९.२३ कोटींचे अनुदान अपेक्षित आहे. विद्यापीठ निधीतून भरलेल्या शिक्षक-शिक्षकेतर पदांच्या वेतनासाठी ३.३७ कोटी असे एकूण ८२.०६ कोटींचे अनुदान मिळणे अभिप्रेत आहे. ३०१.१४ कोटींतून अनुदान वगळले, तर २१९.०८ कोटींचा महसुली खर्च अपेक्षित धरला आहे. त्यापैकी थेट विद्यार्थ्यांसाठी ४२.५४ कोटींची तरतूद केली आहे. एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही तरतूद १९.४१ टक्के आहे.
संरक्षण व्यवस्थेवरील खर्चासह स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी १८.५९ कोटींची तरतूद आहे. विद्यापीठ साधारण निधीत ८०.४२ कोटी जमा होईल, असे गृहीत धरले आहे. मुलांचे वसतिगृह क्रमांक ५, मुलांचे वसतिगृह (रुसा), तसेच धाराशिव विद्यापीठ उपपरिसर येथे मुलांच्या वसतिगृहांसाठी ३.७५ कोटी मिळतील. स्मृतिशेष वसंतराव काळे स्वाभिमान शिक्षण योजना अर्थात ‘कमवा व शिका’ योजनेसाठी १.३० कोटींची तरतूद केली आहे. परीक्षा विभागावर २३.७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. उत्तरपत्रिकांच्या डिजिटल इव्हॅल्युएशन करण्यासाठी १.५५ कोटींची तरतूद आहे.
विद्यार्थी कल्याण मंडळासाठी २.४६ कोटी रुपये सिंथेटिक ट्रॅक, जिम हॉल, पॅव्हेलियन, क्रीडा विभागासाठी २ कोटी, संतपीठ ५० लाख, ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स ६.८० लाख, फॉरेन्सिक सायन्स ५८ लाख, विद्यार्थी विकास मंडळ २.४६ कोटी, सुवर्णमहोत्सवी फेलोशिप आणि शेतकरी-शेतमजुरांच्या पाल्यांच्या फेलोशिपसाठी प्रत्येकी १ असे दोन कोटी राखीव ठेवले आहेत. अध्यासन केंद्रातील फेलोशिप४५ लाख, दिव्यांग आणि तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्यासाठी यंदा दीड कोटींची भरीव तरतूद आहे. सॅनिटरी नॅपकिन ३ लाख, अध्यासनातील संशोधनांसाठी दीड कोटी, ग्रंथालयासाठी २.५३ कोटी, तर धाराशिव उपकेंद्रासाठी फक्त १६ लाख राखीव ठेवले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.