आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी रिसर्च:नेत्रदानातील एकूण डोळ्यांपैकी केवळ 30 टक्केच डोळे पाहतात नव्याने जग, दान केलेले 40 टक्के डोळे निरुपयोगी

नामदेव खेडकर | औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ ही उक्ती डोळ्यासमोर ठेवून अनेक जण नेत्रदानाचा संकल्प करतात. मात्र, दान केलेल्या १०० डोळ्यांपैकी फक्त ३० डोळेच पुन्हा सृष्टी पाहू शकतात. एकूण नेत्रदानापैकी ४०% डोळे निरुपयोगी ठरतात. जे ६०% डोळे प्रत्यारोपणासाठी उपयोगी येतात, त्यापैकी ५० टक्केच लोकांनाच पुन्हा नजर येते. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीत ही बाब समोर आली.

जे निरुपयोगी डोळे असतात, ते वैद्यकीय प्रयोगासाठी वापरून शेवटी कचऱ्यातच (बायोमेडिकल वेस्ट) फेकून द्यावे लागतात. विशेष म्हणजे जे जन्मत: दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत, अशा व्यक्तींपैकी अवघ्या १५ ते २० टक्केच व्यक्तींवर कॉर्निअल ट्रान्सप्लांट अर्थात नेत्ररोपण करता येते. मरणोत्तर नेत्रदानातून आलेल्या डोळ्यांचा सर्वाधिक वापर हा अपघात किंवा विविध आजारांमुळे ज्यांची दृष्टी क्षीण होते, अशांसाठीच होत असल्याचे निष्कर्ष नेत्र शल्यचिकित्सकांनी नोंदवले आहेत.

अख्खा डोळा दान, उपयोग पडद्याचा
मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा व्यक्त केलेल्या व्यक्तीचा अख्खा डोळा काढून तो आयबँकेत संवर्धित केला जातो. नेत्रप्रत्यारोपण म्हणजे अख्खा डोळा बदलला जातो, हा गैरसमज आहे. नेत्रप्रत्यारोपण म्हणजे केवळ डोळ्याचा वरचा पडदा (कॉर्निया) बदलला जातो.

3 वर्षांत राज्यात एकूण नेत्रदान 11180
1068 नेत्ररोपण प्रतीक्षेतील व्यक्ती
5853 राज्यात एकूण नेत्ररोपण
50% नेत्रप्रत्यारोपण यशस्विता

प्रत्यारोपणाची यशस्विता
१०० नेत्रदानापैकी ६० डोळ्यांचा कॉर्निया ट्रान्सप्लान्टयोग्य असताे. या ६० डोळ्यांचे कॉर्निया ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्यातील केवळ ३० डोळ्यांनाच नजर येते. उर्वरित ट्रान्सप्लान्ट हे अयशस्वी ठरतात.

१४ दिवसच उपयोगाचे
मृत व्यक्तीचे डोळे काढून घेतल्यानंतर ते अधिकाधिक १४ दिवस संवर्धित करता येतात. जेवढे लवकर त्याचे प्रत्यारोपण होईल, तेवढी यशस्विता अधिक असते. १४ पेक्षा अधिक दिवसांचे डोळे थेट बायो-मेडिकल वेस्टमध्ये जातात.

नजर कमी का राहते?
औरंगाबादचे नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रोहित बंग म्हणाले, नजर जाणे किंवा जन्मत: अंधत्वमागे खूप कारणे आहेत. बुब्बुळाच्या आतमध्ये लेन्स, रेटिना व व्हेन्स असतात. हे भाग नजर उत्तम राहण्यासाठी योग्यस्थितीत असणे आवश्यक असते. मात्र, टीक पडणे, संसर्ग, कॉर्नियल डिस्ट्रॉफी आदी कारणांमुळे आतील भाग कमकुवत होतो. त्यामुळे नेत्र प्रत्यारोपण (कॉर्नियल ट्रान्सप्लान्ट) केल्यानंतरही १०० टक्के नजर येत नाही.

नेत्र प्रत्यारोपण करणाऱ्यांचे अनुभव
1 माजलगाव तालुक्यातील एक ४५ वर्षीय महिलेच्या एका डोळ्यात टीक होती. यामुळे तिची नजर कमकुवत झाली होती. त्यांनी औरंगाबादमधील एका रुग्णालयात कॉर्निया ट्रान्सप्लान्ट केला. आता त्यांची दृष्टी ५० टक्क्यांपर्यंत परतली आहे.
2 औरंगाबादेतील जन्मत: अंध एका शासकीय कर्मचाऱ्यावर कॉर्निया ट्रान्सप्लांट केला. मात्र, त्यांना केवळ २० टक्केच नजर आली. आधी काहीच दिसत नव्हते. आता समोरून कुणीतरी व्यक्ती जात आहे किंवा समोर काहीतरी वस्तू आहे, याचा अंदाज येतो.
3 औरंगाबादेतील ७१ वर्षीय पुरुषाची दोन्ही डोळ्यांची नजर कमी झाली. ३ वर्षांपूर्वी कॉर्निया ट्रान्सप्लांटनंतर त्यांना ४० ते ५०% नजर आली. ६ महिन्यांनी ती पुन्हा कमी झाली. त्यांनी दुसऱ्यांदा कॉर्निया ट्रान्सप्लान्ट केला. आता त्यांना ५०% पर्यंत नजर आली. ती किती दिवस राहील, याची खात्री डॉक्टर देत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...