आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यावर एकनाथ शिंदे रविवारी (३१ जुलै) पहिल्यांदाच औरंगाबादचा दौरा करत आहेत. त्यात जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी त्यांनी दीड तास राखीव ठेवला असून स्वागत सोहळे, भाषणे आणि शिंदेसेना समर्थक आमदारांच्या शक्तिप्रदर्शनासाठी दहा तास दिले आहेत.
रविवारी सकाळी १० ते ११.३० वेळेत ते विभागीय आयुक्तालयात मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि विकासकामांबाबत आढावा बैठक घेतील. त्यानंतर मात्र सिल्लोड व औरंगाबाद येथे समर्थक आमदार, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, सत्कार सोहळे, रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करण्यात ते रात्री १० ते १०.३० वाजेपर्यंत व्यग्र असतील.
आमदार जैस्वाल : खास इंदूर येथून मागवली एक किलो वजनाची, चांदीची गणेशमूर्ती
औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नारळीबाग येथील कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री ७.३० वाजता पोहोचतील. जैस्वाल यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अर्धा तास राखीव ठेवला आहे. खास इंदूर येथून मागवलेली एक किलो वजनाची चांदीची गणेशमूर्ती देऊन मी मुख्यमंत्र्यांचे दणक्यात स्वागत करणार आहे, असे आमदार जैस्वाल यांनी सांगितले. शिंदेसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे क्रांती चौकात शिंदे यांना चांदीची गदा भेट देण्याची तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आमदार शिरसाट : नातवासोबत शिंदेंच्या भावनिक फोटोची फ्रेम भेट म्हणून देणार
एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आमदार संजय शिरसाट यांच्या कोकणवाडी येथील कार्यालयात मुख्यमंत्री रविवारी रात्री ८.१५ वाजता पोहोचतील. तेथे ते तासभर थांबणार आहेत. शिंदे यांच्या स्वागताची आमदार शिरसाट आणि त्यांच्या समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. गेल्या महिन्यात शपथविधीच्या वेळी मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या नातवासोबतचा फोटो खूप व्हायरल झाला होता. या भावनिक फोटोची सुमारे २ फूट लांब, एक फूट रुंद फ्रेमची विशेष भेट शिरसाट मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.
आमदार सावे : ठेचा, पिठलं-भाकरी असा अस्सल मराठवाडी भोजनाचा बेत तयार
आमदार संजय शिरसाट यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे हे आमदार संदिपान भुमरेंच्या सूतगिरणी चौकातील कार्यालयात रात्री ९.३० वाजता पोहोचतील. तेथे फक्त १५ मिनिटे थांबून सत्कार स्वीकारतील. त्यानंतर भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या ज्योतीनगर येथील निवासस्थानीही जाणार आहेत. या दौऱ्यातील हा शेवटचा टप्पा असल्याने तेथे सावेंनी शिंदे व इतर आमदारांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केली आहे. ठेचा, पिठलं - भाकरी असा अस्सल मराठवाडी भोजनासह काही पंजाबी डिशेसचाही बेत सावेंकडे असेल. येथून मुख्यमंत्री थेट विमानतळाकडे जातील व रात्री ११ वाजता मुंबईकडे जातील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.